‘एमएसएमई’ क्षेत्रात पाच कोटी रोजगार उपलब्ध करून देणार

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

हैद्राबाद – 11 कोटी जणांना रोजगार देणारे ‘मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योग’ (एमएसएमई) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सध्या या क्षेत्राचा देशाच्या ‘जीडीपी’मधील हिस्सा 30 टक्के इतका आहे. तो पुढच्या काळात 50 टक्क्यांवर नेण्याचे व त्याद्वारे पाच कोटी रोजगारनिर्मितीचे ध्येय केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. ग्रामीण उद्योगक्षेत्राची वार्षिक उलाढाल सध्या 80 हजार कोटी इतकी आहे. पुढच्या दोन वर्षात ती पाच लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारसमोर असल्याचे केंद्रीय मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ने (सीआयआय) आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. आत्तापर्यंत ‘एमएसएमई’ क्षेत्राने देशात 11 कोटी जणांना रोजगार दिलेला आहे. म्हणूनच हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच पुढच्या काळात या क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमधील वाटा 30 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर नेण्याचे ध्येय केंद्र सरकारने आपल्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी निर्यात वाढवावी लागेल. सध्या भारतातून केल्या जाणाऱ्या एकूण निर्यातीत ‘एमएसएमई’चा हिस्सा 48 टक्के इतका आहे. ही हिस्सा 60 टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर केंद्र सरकार काम करीत आहे, असे गडकरी म्हणाले.

याद्वारे ‘एमएसएमई’ क्षेत्रात आणखी पाच कोटी जणांना रोजगार मिळेल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला. याबरोबरच ग्रामीण क्षेत्राशी निगडीत असलेल्या हँडलूम, हस्तकला उद्योग, खादी ग्रामोद्योग यांची वार्षिक उलाढाल सुमारे 80 हजार कोटी इतकी आहे. पुढच्या दोन वर्षात ही उलाढाल पाच लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारच्या समोर असल्याचा दावा गडकरी यांनी केला.

सध्या देशात उत्तमोत्तम रस्ते उभे राहिले असून वीजेचीही पर्याप्त प्रमाणात उपलब्धता आहे. तसेच कामगारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा व प्रशासकीय कायद्यांमध्येही सुधारणा होत आहे, याचा दाखला देऊन देशात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. तसेच देशभरात सुमारे 22 नवे ‘ग्रीन हायवे’ प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लक्षात आणून दिले. कोरोनाच्या संकटामुळे साऱ्या जगासमोर मोठी आव्हाने खडी ठाकली आहेत. पण अशा काळातही भारतासाठी काही नव्या संधी चालून आल्या आहेत. त्याचा लाभ घ्यायला हवा, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

leave a reply