म्यानमारने २२ दहशतवाद्यांना भारताकडे सोपविले

नवी दिल्ली – म्यानमारने भारतविरोधी कारवाई करणाऱ्या २२ दहशतवाद्यांना भारताकडे सोपविले आहे. या संर्दभातली ही सर्व मोहीम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आली होती. हा भारताचा राजनैतिक विजय ठरतो. तसेच यामुळे भारत आणि म्यानमारचे द्विपक्षीय सहकार्य अधिकच दृढ झाल्याचे दिसते.

गेल्या कित्येक वर्षांपासून बंडखोर म्यानमारच्या भूमीचा वापर करुन ईशान्य भारतात अस्थैर्य माजवित आहे. पण भारताने या आघाडीवर म्यानमारच्या लष्कराचे सहकार्य घेऊन दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. २०१५ साली भारताने ‘ऑपरेशन म्यानमार’ नावाची बेधडक कारवाई केली होती. त्यानंतर आता भारताने राजनैतिक पातळीवर ऑपरेशन राबवून २२ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. म्यानमारच्या लष्कराने वेगवेगळ्या कारवाईत या दहशतवाद्यांना पकडले होते. हे खतरनाक दहशतवादी भारतासाठी ‘वॉन्टेड’ होते. शुक्रवारी म्यानमार सरकारने या २२ जणांना विशेष विमानाने भारतात धाडले. त्यानंतर त्यांना मणिपूर आणि आसामच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

‘युनायटेड नॅशनल लिब्ररेशन फ्रंट'(युएनएलएफ), ‘पिपल्स रिव्ह्युलेशनरी पार्टी ऑफ कांगलेयपाक (पीआरईपीएके), ‘पिपल्स लिब्ररेशन आर्मी’ (पीएलए) , ‘नॅशनल डेमॉक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँन्ड’ (एनडीफबी)या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा ताबा मिळविण्यात भारताला यश मिळाले आहे. आता या दहशतवाद्यांची कसून चौकशी होईल. यासाठी गेले वर्षभर भारत म्यानमारच्या संपर्कात होता.

गेल्यावर्षी म्यानमारच्या संरक्षण दलाचे प्रमुख भारताच्या भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुलक्षा सल्लागार डोवल यांची भेट घेतली होती. त्या दरम्यान दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा पार पडली होती.

leave a reply