इराणला स्पष्ट संदेश देण्यासाठी ‘नातांझ स्फोट’ घडविण्यात आला

- इस्रायली वर्तमानपत्राचा दावा

जेरूसलेम – अणुबॉम्ब निर्मितीच्या दिशेने पावले टाकणार्‍या इराणकडून रेड लाईनची मर्यादा ओलांडणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. इराणच्या राजवटीपर्यंत हा स्पष्ट संदेश पोहोचविण्यासाठी नातांझ अणुप्रकल्पातील युरेनियम संवर्धन प्रकल्पात स्फोट घडविण्यात आला होता, असा दावा इस्रायलच्या आघाडीच्या ‘द जेरूसलेम पोस्ट’ या वर्तमानपत्राने केला. त्याचबरोबर हा स्फोट सायबर हल्ल्यातून नाही तर प्रत्यक्ष घातपाताने घडविण्यात आला, असेही इस्रायली वर्तमानपत्राने म्हटले आहे. यासाठी इस्रायली वर्तमानपत्राने परदेशी माध्यमांनी केलेल्या दाव्यांचा तसेच इस्रायली नेत्यांच्या विधानांचा दाखला दिला आहे.

दोन महिन्यांपूर्वी, २ जुलै रोजी इराणच्या नातांझ या अतिसंरक्षित अणुप्रकल्पात संशयास्पद स्फोट झाला होता. सुरुवातीला इराणने या स्फोटाची माहिती उघड करण्याचे टाळले. पण स्थानिकांनी सोशल मीडियातून या स्फोटाचे फोटो व व्हिडिओज शेअर केल्यानंतर इराणला हा स्फोट झाल्याचे मान्य करावे लागले. सुरुवातीला ‘होमलँड चिताज्’ या इराणी बंडखोर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये इराणने या स्फोटाबाबत वेगवेगळी विधाने केली असून हा एक घातपात असल्याचा दावाही केला होता. मात्र इराणने आतापर्यंत नातांझ स्फोटासाठी इस्रायलवर थेट आरोप करण्याचे टाळले, याकडे इस्रायली वर्तमानपत्राने लक्ष वेधले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या या स्फोटाबाबत बोलण्याचे टाळले होते. पण इस्रायलच्या काही नेत्यांनी सदर स्फोटाबाबत केलेल्या विधानांचा दाखला या वर्तमानपत्राने दिला. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी या स्फोटाशी इस्रायलचा संबंध असल्याचे संकेत दिले होते. इराणला अण्वस्त्रसज्ज न होऊ देणे ही इस्रायलची स्पष्ट भूमिका असून अण्वस्त्रसज्ज इराण इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे अश्केनाझी म्हणाले होते. तसेच इस्रायलच्या कारवाईबाबत न बोललेले बरे, असे सूचक उद्‍गार परराष्ट्रमंत्री अश्केनाझी यांनी काढले होते. त्यामुळे नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटाशी इस्रायलचा संबंध असल्याचा दावा सदर वर्तमानपत्राने केला.

त्याचबरोबर या स्फोटाने नातांझ अणुप्रकल्प तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाला मोठा फटका बसल्याचे इस्रायली वर्तमानपत्राने म्हटले आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी’ या अमेरिकी अभ्यासगटाचे अध्यक्ष डेव्हिड अल्ब्राईट यांनी इस्रायली वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीत, सदर स्फोटात नातांझ प्रकल्पाचे तीन चतुर्थांश अधिक नुकसान झाले आहे. यामुळे इराणचा अणुकार्यक्रम दोन ते सहा वर्षांसाठी मागे गेल्याचे अल्ब्राईट यांनी सांगितले. त्याचबरोबर सदर अणुप्रकल्पाच्या इमारतीचे नुकसान पाहता, ही इमारत लवकर उभी राहणे आणि युरेनियमचे संवर्धन पुन्हा सुरू होणे अवघड असल्याचे अल्ब्राईट म्हणाले आहेत. या स्फोटामुळे इराणचे प्रगत सेंट्रीफ्युजेसवरील संशोधन रोखले गेल्याचे अल्ब्राईट यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे नातांझमधील स्फोट हा इराणच्या राजवटीसाठी इस्रायलचा संदेश होता, असा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला आहे.

leave a reply