राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल अफगाणिस्तानच्या भेटीवर

काबूल – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल दोन दिवसांच्या अफगाणिस्तानच्या अघोषित दौर्‍यावर आले आहेत. सध्या अफगाणिस्तानात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर डोवल यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. डोवल यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी व प्रमुख नेते डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांची भेट घेतली. तसेच अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहीब यांच्याशी डोवल यांची चर्चा पार पडली. उभय देशांच्या समान सामरिक हितसंबंधांवर या भेटीत चर्चा झाल्याचे अफगाणिस्तानच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या या अफगाणिस्तान दौर्‍याचे तपशील भारताकडून अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र अमेरिका-तालिबानमध्ये झालेला शांतीकरार धोक्यात आलेला असताना, डोवल यांची ही अफगाणिस्तानची भेट लक्षवेधी ठरते. गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात तालिबानने हिंसाचाराचे सत्र सुरू केले असून अफगाणी लष्कराबरोबरील तालिबानचा संघर्ष अधिकाधिक रक्तरंजित बनत चालला आहे. अशा काळात अमेरिकन लष्कराने तालिबानवर हवाई हल्ले चढवून अफगाणी लष्कराला सहाय्य पुरविले होते. अमेरिकेचे हे हवाई हल्ले म्हणजे दोहा येथे झालेल्या शांतीकराराचे उल्लंघन ठरते, असा आरोप तालिबानने केला आहे. तर तालिबान हिंसक कारवाया रोखत नसल्याने अफगाणी जवान व जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी अमेरिकेने हे हवाई हल्ले चढविले होते, असा खुलासा अमेरिकेकडून देण्यात येत आहे. पुढच्या काळातही तालिबानवर असे हल्ले सुरू राहतील, असे अमेरिकेने बजावले आहे.

यामुळे कतारच्या दोहा येथे अमेरिका व तालिबानमध्ये पार पडलेला शांतीकरार धोक्यात आला आहे. तालिबान स्पष्टपणे तसे इशारे देत आहे. तसेच अफगाणिस्तानचे सरकार व तालिबानमध्ये समेट होण्याची शक्यताही यामुळे निकालात निघाल्याचे दिसते. यामुळे अफगाणिस्तानातील शांतीकराराचे श्रेय घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेणार्‍या पाकिस्तानची अवस्था बिकट बनली आहे. भारताने याआधीच अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रिया अफगाणींचा सहभाग असलेली, त्याचे नेतृत्त्व व नियंत्रण अफगाणींकडेच असलेली असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वेगळ्या शब्दात भारताने अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेत पाकिस्तानची लुडबूड फलदायी ठरणार नाही, असे बजावले होते. भारताची ही चिंता सार्थ ठरली असून तालिबानबरोबरील हा शांतीकरार मोडण्याच्या स्थितीत असल्याचे दिसते.

लवकरच अमेरिका आपले अफगाणिस्तानातील सैन्य मागे घेणार असून त्याचे परिणाम अफगाणिस्तानमध्ये दिसू लागतील, तालिबान लवकरच अफगाणिस्तानचा ताबा घेईल, अशी चिंता व्यक्त केली जाते. या पार्श्‍वभूमीवर, भारताने अफगाणिस्तानला लष्करी सहकार्य पुरविण्याचा प्रस्ताव दिल्याचे दावे काही परदेशी वृत्तसंस्थांनी केले होते. तर अफगाणिस्तानचे सरकार तालिबानचा मुकाबला करण्यासाठी भारताकडे लष्करी सहाय्याची अपेक्षा करीत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

मात्र भारत अफगाणिस्तानात आपले सैन्य तैनात करणार नाही, असा निर्वाळा लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी एकाच दिवसापूर्वी दिला होता. अशा परिस्थितीत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अफगाणिस्तान दौर्‍यात या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तविली जाते. भारताच्या अफगाणिस्तानबरोबरील सहकार्याचा आपल्या हितंसबंधांना धोका असल्याचे मानणार्‍या पाकिस्तानला यामुळे फार मोठा धक्का बसू शकतो.

leave a reply