रशियाच्या आक्रमक हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर नॉर्वे व स्कॉटलंडमध्ये नाटोचा युद्धसराव सुरू

ऑस्लो/लंडन – युक्रेनच्या सीमेवर मोठी लष्करी तैनाती करून बेदरकार हालचाली करणार्‍या रशियाविरोधात नाटोने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन आठवड्यांपूर्वी नाटो सदस्य देशांनी ‘डिफेन्डर युरोप’ युद्धसराव केला होता. त्यापाठोपाठ आता नॉर्वे व स्कॉटलंडमध्ये ‘फॉर्मिडेबल शिल्ड’ युद्धसरावाला सुरुवात झाली आहे. ३ जूनपर्यं चालू राहणार्‍या या सरावात १० सदस्य देशांचे नौदल व हवाईदल सहभागी झाल्याची माहिती नाटोने दिली आहे.

नाटोचा युद्धसरावगेल्या महिन्यात रशियाने युक्रेन सीमेला जोडून असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती केली होती. रशियाने या क्षेत्रात जवळपास एक लाख जवान धाडल्याचे दावे समोर आले होते. रशियाच्या या तैनातीत प्रगत क्षेपणास्त्रे, हवाईसुरक्षा यंत्रणा तसेच मोठ्या प्रमाणावर रणगाड्यांचा समावेश होता. त्यामुळे रशिया पुन्हा एकदा युक्रेनविरोधात मोठ्या संघर्षाची तयारी करीत असल्याचे संकेत मिळाले होते.

रशियाच्या या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर नाटोने युरोपात मोठ्या सरावांचे आयोजन केले असून युक्रेनबरोबरही सराव करण्याचे संकेत दिले आहेत. शनिवारी नॉर्वेतील अँड्रोया व स्कॉटलंडमधील ‘हेब्रिजेस रेंज’मध्ये युद्धसरावाला सुरुवात झाली. ‘फॉर्मिडेबल शिल्ड’ नावाचा हा सराव ‘एअर ऍण्ड मिसाईल एक्सरसाईज’ प्रकारातील सराव असल्याची माहिती नाटोने दिली आहे. नाटोच्या १० सदस्य देशांच्या १५ युद्धनौका व अनेक लढाऊ विमाने यात सहभागी झाली आहेत.

तीन हजारांहून अधिक जवानांचा समावेश असलेल्या या सरावात अमेरिकेच्या ‘सिक्स्थ फ्लीट’ व ब्रिटनच्या नौदलाचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. या देशांव्यतिरिक्त फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, नॉर्वे, डेन्मार्क, बेल्जियम, नेदरलॅण्ड्स हे देश सरावात सामील झाले आहेत. ब्रिटनच्या ‘रॉयल नेव्ही’च्या तीन आघाडीच्या विनाशिका सरावात सहभागी असून ‘मिसाईल डिफेन्स’ यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती ब्रिटीश सूत्रांनी दिली.

leave a reply