रशियातील नैसर्गिक आपत्तींचे स्वरुप अभूतपूर्व

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – रशियात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तींची व्याप्ती अभूतपूर्व असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले आहे. रशियाच्या दक्षिण भागांमध्ये महिन्याचा पाऊस काही तासांमध्ये पडतो आहे तर अतिपूर्वेकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पेटलेले वणवे अद्यापही थांबलेले नाहीत, असे सांगून पुतिन यांनी रशियातील बदलत्या हवामानाकडे लक्ष वेधले. गेल्याच महिन्यात रशियन यंत्रणांनी वणवे विझविण्यासाठी ‘क्लायमेट इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी’चा वापर केल्याचे वृत्त समोर आले होते.

रशियातील नैसर्गिक आपत्तींचे स्वरुप अभूतपूर्व - राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनगेल्या महिन्यापासून रशियाचा अतिपूर्वेकडील भाग असणाऱ्या सैबैरियात प्रचंड प्रमाणात वणवे भडकले आहेत. आतापर्यंत या वणव्यांमध्ये तब्बल 94 लाख हेक्टर्स क्षेत्र जळून खाक झाले आहे. युरोपमधील पोर्तुगाल या देशापेक्षाही हे क्षेत्र मोठे आहे. या वणव्यांमागे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ व त्यामुळे आलेली उष्णतेची लाट ही प्रमुख कारणे असल्याचे रशियन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. वाढत्या तापमानापाठोपाठ सैबैरियाला ‘ड्राय स्टॉर्म्स’चा फटका बसला असून, यातूनच वणवे पेटल्याची माहिती देण्यात आली आहे. वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रशियन लष्करही तैनात करण्यात आले आहे.

रशियातील नैसर्गिक आपत्तींचे स्वरुप अभूतपूर्व - राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनदुसऱ्या बाजूला दक्षिण रशियामधील क्रॅस्नोडर व क्रिमिआ प्रांतांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टी व वादळांमुळे क्रॅस्नोडर प्रांतातील एक हजारांहून अधिक घरांमध्ये तसेच इमारतींमध्ये पाणी शिरले आहे. पूरस्थितीमुळे राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग वाहून गेला असून एक लाखांहून अधिक नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. या भागातील दीड हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपत्कालिन विभागाचे सुमारे अडीच हजार जवान तैनात करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

रशियातील नैसर्गिक आपत्तींचे स्वरुप अभूतपूर्व - राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनएकापाठोपाठ आलेल्या या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी संबंधित प्रांतांचे प्रमुख व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत, पुतिन यांनी नैसर्गिक आपत्तींचे स्वरुप अभूतपूर्व असल्याचे बजावले. रशियातील या आपत्तींनी हवामान व पर्यावरणाच्या अजेंड्यावर नियोजनबद्ध रितीने काम करणे किती आवश्‍यक आहे, हे दाखवून दिले आहे असा दावाही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यावेळी केला. दरम्यान, नैसर्गिक आपत्तींना प्रभावीरित्या तोंड देण्यासाठी रशियाने ‘नॅशनल रिस्पॉन्स सेंटर’ची स्थापना केल्याची माहितीही समोर आली आहे.

leave a reply