चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेसह चार देशांचा नौदल सराव

गुआम – चीनकडून साऊथ चायना सीसह पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया वाढत असतानाच अमेरिकेने गुआमनजिक व्यापक नौदल सराव सुरु केला आहे. ‘पॅसिफिक व्हॅनगार्ड’ असे नाव असलेल्या या सरावात अमेरिकेसह जपान, ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरियन नौदलाचा समावेश आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत अमेरिकेकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला हा दुसरा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे.

चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेसह चार देशांचा नौदल सरावजुलै महिन्यात अमेरिकेने साऊथ चायना सीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना चीनविरोधात उघड संघर्षाची भूमिका जाहीर केली होती. या क्षेत्रातील इतर देशांच्या ताब्यातील भाग चीनने बळकावल्याचा आरोप ठेवून, अशा देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका ठामपणे उभी राहील, असा इशारा अमेरिकेने दिला होता. तरीही चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपल्या लष्करी सामर्थ्याचे जोरदार प्रदर्शन सुरू ठेवले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने सहकारी देशांबरोबर एकापाठोपाठ सरावांचे आयोजन सुरू केले आहे.

पॅसिफिक महासागरातील गुआम बेटानजिक सुरू झालेला ‘पॅसिफिक व्हॅनगार्ड’ हा सरावही त्याचाच भाग आहे. यात अमेरिकेसह जपान, ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरियाच्या आठ युद्धनौका, एक पाणबुडी व दीड हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत. पॅसिफिक क्षेत्रातील सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य व स्थैर्य यासाठी अमेरिका आपल्या सहकारी देशांसह वचनबद्ध आहे, या शब्दात अमेरिकी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी कमांडर ख्रिस्तोफर गाहल यांनी सरावामागची भूमिका स्पष्ट केली.

जुलै महिन्यात अमेरिकेने एकाच वेळी गुआम बेट, तैवानचे आखात आणि फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत व्यापक युद्धसराव आयोजित केले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ‘रिम ऑफ पॅसिफिक २०२०’ हा नौदल सराव पार पडला होता. त्यात अमेरिकेसह १० देशांच्या २२ युद्धनौका, पाणबुडी व पाच हजारांहून अधिक जवान सहभागी झाले होते. एकापाठोपाठ करण्यात येणारे हे सराव चीनच्या कारवायांविरोधात देण्यात आलेला इशारा मानला जातो.

leave a reply