एनसीबीच्या कारवाईत मुंबईत 120 कोटींचे ‘मेफेड्रोन’ जप्त

अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या टोळीचे सहा जण ताब्यात

मुंबई – मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेल्या कारवाईत मुंबई व गुजरातमधून 120 किलोचे ‘मेफेड्रोन’ जप्त करण्यात आले व या तस्करीत गुंतलेल्या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली. एअर इंडियाच्या माजी वैमानिकाचाही यामध्ये समावेश आहे. या सर्वांच्या चौकशीत माफिया टोळीबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता असून या टोळीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी यामुळे मदत मिळू शकते. गुरुवारीच डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 100 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते.

Mephedroneगुजरातच्या जामनगर येथील नौदलाच्या इंटेलिजन्स युनिटचा अहवाल एनसीबीला मिळाला होता. नौदलाकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारावर दिल्लीतील एनसीबी मुख्यालय आणि मुंबईच्या विभागीय कार्यालयाने एक ऑपरेशन हाती घेऊन जामनगर येथून 10 किलो मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणात एनसीबीने एकाला अटक केली होती. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबईतून तिघांना अटक करण्यात आली. या तपासात आणखी काही धागेदोरे उघड झाले. त्यानंतर एनसीबीने मुंबईच्या फोर्ट भागातील एस. बी. रोड परिसरातील एका गोडाऊनवर छापा टाकला आणि तेथून 50 किलो मेफेड्रोनसह दोघा जणांना अटक करण्यात आली. यामध्ये या तस्करीत गुंतलेल्या प्रमुख गुन्हेगाराचा समावेश आहे.

हे सर्व आरोपी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाच सिंडिकेटशी निगडित आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. ही टोळी निरनिराळ्या राज्यात पसरलेली असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एनसीबीने केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते.

एनसीबीने कारवाईत पकडलेला एकजण एअर इंडियाचा माजी वैमानिक आहे. त्याने वैद्यकीय कारण पुढे करून 2018 साली नोकरी सोडली होती. त्यानंतर तो या टोळीशी जोडला गेला, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच पकडण्यात आलेल्यांमध्ये एकजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. 2001 साली त्याला डीआरआयने 350 किलो मॅन्ड्रॅक्स ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणामध्ये अटक केली होती. 2008 साली त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता. चौकशीत पकडण्यात आलेले सहाही जण आधीपासून अमली पदार्थांच्या तस्करीशी जोडलेले असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी आतापर्यंत 225 किलो मेफेड्रोनची तस्करी केल्याचे समोर येत आहे.

एनसीबीने छाप्यात जे मेफेड्रोन जप्त केले, ते मुंबईतील एका प्रयोगशाळेत तयार करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या ॲन्टी नार्कोटिक्स सेलने (एएनसी) ही प्रयोगशाळा आधीच उद्ध्वस्त केली आहे, अशी माहितीसी एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिली. काही दिवसांपूर्वीच मुंबईत 60 किलो मेफेड्रोन पकडण्यात आले होते. या प्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत या प्रयोगशाळेची माहिती एएनसीला मिळाली होती. त्यामुळे एएनसीने आधी केलेल्या कारवाईत अटक केलेल्या आरोपींचीही आता एनसीबी नव्याने चौकशी करणार आहे.

मेफेड्रोन या सिंथेटिक ड्रगला एमडी आणि म्याव म्याव पार्टी ड्रग्ज म्हणूनही ओळखले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई, गुजरातसह देशातील काही भागात मोठ्या प्रमाणात मॅफेड्रोन जप्त करण्यात आले होते. तसेच मुंबई, गुजरात, गोवा, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल या किनारपट्टीवरील राज्यातून इतरही अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर पकडले गेले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 21 हजार कोटी रुपयांचे तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

एप्रिल महिन्यात डीआरआयने केलेल्या कारवाईत कांडला बंदरातून 1439 कोटींचे हेरॉईन, तर मे महिन्यात कोची बंदरातून 50 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. त्याच महिन्यात मुंद्रा पोर्टमधून 500 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडला होता. जुलै महिन्यात पिपावाव बंदराजवळ 450 कोटी रुपयांचा, मुंद्रा बंदरात 376 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

ऑगस्ट महिन्यात मुंबईत 1400 कोटी रुपयांचे 700 किलो इतके मेफेड्रोन पकडण्यात आले होते. नालासोपारामध्ये हे सिंथेटिक ड्रग बनविणारा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आला. तर याच महिन्याच्या सुरुवातीला नवी मुंबईत संत्र्याच्या ट्रकमध्ये 1476 कोटी रुपयांचा मेफेड्रोनचा साठा पकडण्यात आला होता. तर त्याआधी उरणमध्ये 1700 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त झाले होते.

leave a reply