अमेरिकेच्या कारवाईचा सूड घेण्यासाठी अल शबाबचे सोमालियात नवे हल्ले

- ११ जणांचा बळी

कारवाईचा सूडमोगादिशू – अल शबाबच्या दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये चढविलेल्या भीषण हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला. या हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेने सोमालियात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अल शबाबच्या ४० दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता. यानंतर अल शबाबने हा हल्ला चढवून सोमालियासह अमेरिकेला इशारा दिल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या व्यापारमंत्री जेनेट येलेन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असताना अल शबाबने हा हल्ला चढविला, ही लक्षणीय बाब ठरते.

अल कायदाशी संलग्न असलेल्या अल शबाब या दहशतवादी संघटनेने राजधानी मोगादिशूच्या अतिसंवेदनशील भागात मोठा हल्ला चढविला. स्थानिक मेयरच्या प्रशासकीय निवासस्थानासमोर दहशतवाद्यांनी पहिला बॉम्बस्फोट केला. त्यानंतर झालेल्या गदारोळाचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा बळी गेल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी दिली होती. पण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात ११ जण ठार तर किमान २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

कारवाईचा सूडअवघ्या चार दिवसात अल शबाबने सोमालियात चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो. गेल्याच आठवड्यात अल शबाबने सोमालियाच्या हिरशाबेले प्रांतातील दोन शहरांमध्ये तिहेरी बॉम्बस्फोट घडविले होते. यातील एक हल्ला इथे तैनात असलेल्या आफ्रिकन महासंघाच्या शांतीसैनिकांच्या पथकामधील जिबौतीच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी घडविण्यात आला होता. या तिहेरी बॉम्बस्फोटात १५ जणांचा बळी गेला होता. हे स्फोट घडविण्याच्या काही तास आधी सोमालियाच्या लष्कराने अल शबाबच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागावर हल्ला चढविला होता. तिहेरी स्फोट घढवून अल शबाबने त्याला प्रत्युत्तर दिल्याचे समोर आले होते.

तर शनिवारी अल शबाबने राजधानी मोगादिशूवर हल्ला चढविण्याच्या काही तास आधी अमेरिकेने या दहशतवादी संघटनेच्या गालकाड भागावर हवाई हल्ले चढविले होते. राजधानी मोगादिशूपासून अवघ्या २८० किलोमीटर अंतरावर असलेल्या गालकाडमधील या कारवाईत अल शबाबचे किमान ४० दहशतवादी ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला होता. आफ्रिकेतील अमेरिकेच्या ‘आफ्रिकॉम’ने ही कारवाई केली होती. सोमालियन सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडे केलेल्या फिर्यादीनंतर ही कारवाई केल्याचे आफ्रिकॉमने स्पष्ट केले.

गेल्या वर्षी बायडेन यांच्याबरोबरच्या भेटीत सोमालियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दहशतवादविरोधी कारवाईसाठी आवाहन केले होते. याला काही महिने उलटल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सोमालियात अमेरिकेच्या ५०० जवानांची तैनाती केली. यानंतर आफ्रिकॉमने अल शबाबवर हल्ले चढविले आहेत. पण पुढच्या चोवीस तासात अल शबाबने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले व सोमालियाची राजधानी मोगादिशूतील सरकारी इमारतीला लक्ष्य केले. याद्वारे अल शबाबने सोमालियन सरकारसह अमेरिकेलाही इशारा दिला आहे.

leave a reply