सिरियन विमानतळावर इस्रायलचे नवे हल्ले

विमानतळावरदमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियातील अलेप्पो विमानतळावर पुन्हा हल्ले चढविले. यामध्ये तीन जणांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. याबरोबरच विमानतळाच्या धावपट्टीचे मोठे नुकसान झाले असून यामुळे पुढील काही दिवसांसाठी हा विमानतळ बंद असेल. सिरियाच्या विमानतळांवरील इस्रायलचे हल्ले म्हणजे युद्धगुन्हे ठरतात, आरोप सिरियन परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तर इराणच्या शस्त्रतस्करीसाठी सहाय्यक ठरणाऱ्या सिरियन विमानतळांना लक्ष्य करण्याचे नवे धोरण इस्रायलने स्वीकारल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

सिरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री इस्रायलच्या विमानांनी अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार हल्ले चढविले. इस्रायली विमानांनी किमान 16 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती रशियन लष्कराने दिली. यामध्ये काही ग्लाईड बॉम्बचा देखील समावेश होता, असे रशियन लष्कराचे म्हणणे आहे. इस्रायलच्या विमानांनी आंतरराष्ट्रीय हवाईहद्दीतून प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्रांनी विमानतळाची धावपट्टी तसेच रेडिओ नेव्हिगेशन यंत्रणा उद्ध्वस्त केली. याआधी इस्रायली विमानांनी लेबेनॉनच्या हवाईहद्दीचा वापर केल्याचा आरोप सिरियाने केला होता.

या हल्ल्यात इतर कुठलीही हानी झाली नसल्याचे सिरियन वृत्तसंस्थेचे म्हणणे होते. पण इस्रायलच्या या हल्ल्यात तिघांचा बळी गेल्याची माहिती ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने दिली. तसेच विमानतळावरील इराणच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोठाराचे जबर नुकसान झाल्याचा दावा या मानवाधिकार संघटनेने केला. हल्ल्यात ठार झालेले इराणी असावेत, असा संशय या मानवाधिकार संघटनेने व्यक्त केला. पण ही माहिती उघड झाल्यानंतर पुढच्या काही तासात सिरियातील अस्साद राजवटीने इस्रायलच्या या हल्ल्याची माहिती उघड करून त्यावर संताप व्यक्त केला.

विमानतळावरनागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून इस्रायलने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. इस्रायलचे हे हल्ले युद्धगुन्हे ठरतात आणि याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागणार असल्याची घोषणा सिरियन परराष्ट्र मंत्रालयाने केली. गेल्या आठवड्यात सिरियन परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायलचे हवाई हल्ले खपवून घेणार नसल्याचे सांगून इस्रायलला याची किंमत चुकवावी लागेल, असे धमकावले होते. त्यानंतर इस्रायलने आणखी एकदा अलेप्पो विमानतळाला लक्ष्य केले आहे.

गेल्या आठवड्यात, बुधवारी इस्रायलने सिरियन राजधानी दमास्कस आणि अलेप्पो येथील विमानतळांवर हल्ले चढविले होते. काही दिवसांसाठी दोन्ही विमानतळांवरील सेवा खंडीत झाल्यानंतर नव्याने विमानतळ खुले करण्यात आले होते. पण मंगळवारच्या हल्ल्यानंतर अलेप्पो विमानतळाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा सिरियन वृत्तसंस्था करीत आहे.

सिरियातील अस्थैर्याचा वापर करून इराण या देशाचा आपल्या विरोधात लष्करी तळासारखा वापर करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. इराणसंलग्न दहशतवादी गट सिरियात एकत्र येत असून त्यांच्यासाठी इराण शस्त्रास्त्रांची तस्करी करीत आहे. मात्र काहीही झाले तरी इराणचे हे कारस्थान इस्रायल यशस्वी होऊ देणार नाही, असे इस्रायलने अनेकवार बजावले होते. सिरियात इस्रायल चढवित असलेल्या हल्ल्यांना ही पार्श्वभूमी आहे.

leave a reply