अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाच्या नव्या सभापतींचा चीनला इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापतीपदावर रिपब्लिकन पक्षाच्या केविन मॅकार्थी यांची नियुक्ती झाली आहे. यासाठी झालेल्या निवडणुकीत मॅकार्थी यांनी आपले डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधी हकीम सेकाऊ जेफ्रिस्‌‍ यांच्यावर 216 विरुद्ध 212 अशा फरकाने मात केली. या विजयानंतर मॅकार्थी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. राष्ट्रीय कर्ज आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा उदय, ही दोन प्रमुख आव्हाने अमेरिकेसमोर असल्याचा दावा मॅकार्थी यांनी केला. या आर्थिक स्पर्धेत जिंकण्यासाठी आपण कुणाशाही आणि प्रत्येकाशी देखील सहकार्य करण्यास तयार असल्याचे मॅकार्थी यांनी जाहीर केले.

US-POLITICS-CONGRESS-SPEAKERमाजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी असलेले केविन मॅकार्थी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅन्सी पेलोसी यांच्या जागेवर आले असून ते प्रतिनिधीगृहाचे सभापती म्हणून काम पाहतील. अटीतटीच्या लढतीत बाजी मारण्यात रिपब्लिकन पक्षाच्या मॅकार्थी यांना मिळालेले हे यश अतिशय महत्त्वाचे ठरते. यामुळे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधीगृहावरील वर्चस्व वाढेल आणि ही बाब राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते, असे दावे केले जातात. त्यातच राष्ट्राध्यक्षपदावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेली चीनविरोधी धोरणे आपण पुढे चालविणार असल्याचे स्पष्ट संकेत मॅकार्थी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात दिले आहेत.

अमेरिकेवरचे राष्ट्रीय कर्ज आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा उदय, ही अमेरिकेसमोर खडी ठाकलेली मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांविरोधात अमेरिकेच्या संसदेतून एकमुखानेच आवाज निघायला हवा. त्याखेरीज ही आर्थिक स्पर्धा अमेरिका जिंकू शकत नाही, असे मॅकार्थी म्हणाले. त्याचवेळी अमेरिकेतील लाखो नोकऱ्या पळविण्यात चीनला इतके यश कसे काय मिळू शकले, याची चौकशी करण्यासाठी आपण सत्ताधारी व विरोधी पक्षाचा सामावेश असलेल्या संसद सदस्यांची कमिटी नेमणार असल्याची घोषणा मॅकार्थी यांनी केली. चीन हा अमेरिकेचा प्रबळ आर्थिक प्रतिस्पर्धी ठरतो. या स्पर्धेत अमेरिकेला जिंकायचे असेल तर चीनने आपल्या देशातून पळवलेल्या लाखो नोकऱ्या अमेरिकेत परत आणाव्या लागतील, असे सांगून मॅकार्थी यांनी चीनविरोधात नव्या व्यापारी युद्धाची तयारी केल्याचे दिसत आहे.

इतिहासात झालेल्या संघर्षात अमेरिका नेहमीच विजयी ठरली आणि या संघर्षातही अमेरिकेला विजय मिळेल, असा विश्वास मॅकार्थी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, चीनबरोबरील आर्थिक स्पर्धेचा व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या उदयाकडे अमेरिकेसमोरी आव्हान म्हणून पाहणाऱ्या मॅकार्थी यांनी नेमक्या शब्दात आपला प्राधान्यक्रम स्पष्ट केला आहे. आपल्या सभापतीपदाच्या कारकिर्दीची सुरूवात चीनची झोप उडविणारी विधाने करून मॅकार्थी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर संदेश दिला आहे. बायडेन प्रशासन चीनकडून मिळत असलेल्या आर्थिक व सामरिक आव्हानांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सारे लक्ष रशियाविरोधी कारवायांकडे केंद्रीत करीत असल्याची टीका अमेरिकी विश्लेषक करीत आहेत. पण पुढच्या काळात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना अशारितीने आपली मनमानी करता येणार नाही, याची सुस्पष्ट जाणीव प्रतिनिधीगृहाच्या नव्या सभापतींनी करून दिलेली आहे.

मॅकार्थी यांनी स्वीकारलेल्या या भूमिकेचे फार मोठे पडसाद अमेरिकेच्या राजकारणात उमटणार असून आंतरराष्ट्रीय राजकारणावरही याचा फार मोठा प्रभाव पडू शकतो.

leave a reply