कोरोनाची नवी लाट पुढील शंभर दिवस भारतासाठी महत्त्वाचे

- नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल

शंभर दिवसनवी दिल्ली – जगात कित्येक देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. भारतातही काही भागात रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून पुढील 100 दिवस महत्त्वाचे असतील, असे नीति आयोगाने सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल यांनी इशारा दिला आहे. सध्या देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र ती बिघडू शकते अशा शब्दात डॉ. पॉल यांनी सावध केले आहे.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्याने सहा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी तिसरी लाट थोपविण्यासाठी राज्यांनी प्रतिबंधनात्मक पावले तातडीने उचलण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) जगभरात गेल्या आठवड्याभरात नवे कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत अनुक्रमे 10 आणि 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट 111 देशांपर्यंत पोहोचला आहे. नेदरलॅण्डमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या एका आठवड्यात 300 टक्क्यांनी, तर स्पेनमध्ये 64 टक्क्यांनी वाढली आहे. आफ्रिकन देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत, याकडे डॉ. व्ही.के.पॉल यांनी लक्ष वेधले.

जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या छायेत आहे. भारतासाठी पुढील 100 दिवस महत्त्वाचे असणार आहेत. या 100 दिवसातच तिसरी लाट येईल की नाही हे ठरेल, असे कोरोनावरील नॅशनल टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीति आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ. पॉल यांनी अधोरेखित केले. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी गेलेली नाही. देशातील 73 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. 47 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती यावेळी डॉ. पॉल यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि ओडीशा या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला व मार्गदर्शक सूचना केल्या. या राज्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. दुसर्‍या लाटेत व पहिल्या लाटेतही याच राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पहायला मिळला होता. याच राज्यांमध्ये गेल्या आठवड्यात नोंद झालेले देशातील 80 टक्के कोरोना रुग्ण आढळले होते, तसेच 83 टक्के मृत्यूंची नोंदही याच राज्यांमध्ये करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तिसर्‍या लाटेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्याचे निर्देश दिले.

विशेषत: केरळ आणि महाराष्ट्राबाबत पंतप्रधान मोदी यांनी जास्त चिंता व्यक्त केली. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जसे या राज्यात रुग्ण वाढू लागले होते, तसेच आताही होताना दिसत आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत काही राज्यांनी निर्बंधही लावले नव्हते, तर मायक्रो कन्टेंनमेंट झोन व नियमांचे कठोर पालन करण्याकडे लक्ष पुरवून या भागात कोरोनाची लाट नियंत्रित करण्यात आली. त्यामुळे आताही रुग्ण वाढत असलेल्या भागांमध्ये मायक्रो कन्टेंनमेंट झोन बनविण्याकडे लक्ष द्या, असे पंतप्रधान म्हणाले.

याशिवाय आयसीयू बेडची क्षमता वाढवा. केंद्र सरकारने आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 23 हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन पॅकेज दिले आहे. त्याचा वापर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करा. केंद्र सरकारने 332 ऑक्सिजन प्रकल्प राज्यांना मंजुर केले होते. त्यातील केवळ 53 प्रकल्पच आतापर्यंत कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्याकडे लक्ष पुरवावे, अशा सूचनाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिल्या.

leave a reply