कोरोनाच्या नव्या लाटा येतच राहतील

- आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा इशारा

नव्या लाटावॉशिंग्टन – रशिया, आग्नेय आशिया व पूर्व युरोपात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना साथीची अखेर होण्याची शक्यता नसून, नव्या लाटा येत राहतील असा इशारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. यापुढील व्हेरिअंट मागासलेल्या व अविकसित देशांमधून येण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांनी बजावले आहे. दरम्यान, जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ४१ कोटींवर गेल्याची माहिती आरोग्ययंत्रणांनी दिली आहे.

अमेरिका, युरोपसह काही प्रमुख देशांमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता हळुहळू कमी होताना दिसत आहे. अनेक देश कोरोनाच्या काळात लादलेले निर्बंध शिथिल करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची साथ कधी संपणार याबाबत चर्चा सुरू झाली असून आरोग्यतज्ज्ञांनी याबाबत सावधगिरीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ‘दरवेळी काही महिन्यांच्या अवधीत कोरोनाचा विषाणू आपले स्वरुप बदलत असल्याचे दिसत आहे. डेल्टा व्हेरिअंटनंतर लसीकरणाचे लाभ समोर येण्यास सुरुवात झाली असतानाच ओमिक्रॉन व्हेरिअंटचा फैलाव सुरू झाला. प्रत्येक वेळी कोरोनाचा व्हेरिअंट आपल्याला धक्के देत असल्याचे दिसते’, अशा शब्दात येल स्कूल ऑफ मेडिसिनच्या अकिको इवासाकी यांनी नव्या व्हेरिअंटबाबत संकेत दिले.

‘जोपर्यंत जगात सर्वांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाच्या नव्या लाटांचा धोका कायम राहिल. कमी उत्पन्न असलेल्या व अविकसित देशांमधून नव्या धोकादायक व्हेरिअंटस्चा उदय होऊ शकतो. हे देश कोरोनाचे नवे रणांगण ठरेल’, असा इशारा ह्युस्टनमधील डॉक्टर पीटर हॉटेझ यांनी दिला. ओमिक्रॉन व्हेरिअंट नैसर्गिक लसीप्रमाणे नव्या लाटाकाम करून जगभरात ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईल, ही समजूत चुकीची आहे, याकडेही हॉटेझ यांनी लक्ष वेधले. ओमिक्रॉन व्हेरिअंट हा कोरोनाचा अंत नाही, असेही त्यांनी यावेळी बजावले.

‘जगाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा विषाणू स्वरुप बदलतो आहे व नवे व्हेरिअंट समोर येत आहेत. ही प्रक्रिया चालू असेपर्यंत कोरोनाच्या साथीचा संसर्ग कायम राहिल’, असे दक्षिण आफ्रिकेतील आघाडीच्या वैद्यकतज्ज्ञ ग्लेंडा ग्रे यांनी बजावले. सध्याच्या आकडेवारीनुसार, जगातील ६० टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत जाण्यासाठी अजून पाच महिने लागू शकतात. तोपर्यंत कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची शक्यता नाही, याकडे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले. पाश्‍चात्य देशांमध्ये लसीकरण तसेच नव्या औषधांमुळे या वर्षाच्या मध्यापर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात आलेली असेल. मात्र अविकसित तसेच विकसनशील देशांमध्ये २०२३ सालातही साथीचा प्रभाव काही अंशी कायम असेल, असे तज्ज्ञांनी बजावले आहे. दरम्यान ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने पूर्व युरोपात ओमिक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचा इशारा दिला आहे.

leave a reply