न्यूझीलंड ‘साऊथ चायना सी’तील धोक्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही

- लष्करी विश्‍लेषकांचा इशारा

क्विन्सटाऊन – कोरोनाच्या साथीमुळे जग थांबले असले तरी एशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला असलेला धोका टळलेला नाही. आजही या क्षेत्राला, विशेषत: साऊथ चायना सीच्या सुरक्षेला असलेला धोका वाढत आहे. या क्षेत्राजवळ असलेला महत्त्वाचा देश म्हणून न्यूझीलंड याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असा इशारा लष्करी विश्‍लेषकांनी दिला.

न्यूझीलंडच्या क्विन्सटाऊन शहरात दोन दिवसांची ‘एशिया पॅसिफिक सिक्युरिटी इनोव्हेशन फोरम’ची बैठक सुरू झाली आहे. सोमवारी, या बैठकीच्या पहिल्या दिवशी लष्करी विश्‍लेषक व अधिकार्‍यांनी साऊथ चायना सीमधून होणारी व्यापारी वाहतूक येत्या काळात धोक्यात येईल, असे बजावले.

‘साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील देश सध्या शस्त्रसज्ज बनत आहेत. कशासाठी? सहकार्य, स्पर्धा किंवा समान हितसंबंधांसाठी ही शस्त्रसज्जता सुरू आहे का? चाचेगिरी किंवा दहशतवाद रोखण्यासाठी की इंधनाने समृद्ध असलेल्या या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी ही शस्त्रसज्जता आहे’, असे प्रश्‍न या बैठकीच्या अध्यक्षा डॉ. अनिता ऍबॉट यांनी केला.

तर ‘साऊथ चायना सीचा मुद्दा संबंधित क्षेत्रातील देशांपर्यंत मर्यादित आहे. त्याचा आपल्याशी काय संबंध, अशी भूमिका स्वीकारणे न्यूझीलंडला परवडणारे नाही. कारण व्यापारी वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या या सागरी क्षेत्रापासून न्यूझीलंड फारसा लांब नाही’, याची जाणीव विश्‍लेषिका पॅमेला विल्यम्सन यांनी करून दिली. येत्या काळात चीनने साऊथ चायना सीचा ताबा घेतला तर त्याचा परिणाम न्यूझीलंडच्या सुरक्षेवरही होऊ शकतो, असा इशारा या बैठकीत सहभागी झालेल्या विश्‍लेषकांनी दिला आहे.

leave a reply