पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात असलेल्या जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील १२ संशयितांचा ‘एनआयए’कडून शोध

- एका दिवसात ११ ठिकाणी छापे

नवी दिल्ली – ‘टेरर फंडिंग’, तसेच हिंसक कारवायांचा कट रचल्या प्रकरणात १२ संशयित दहशतवाद्यांची ओळख ‘एनआयए’ने पटविली आहे. ‘एनआयए’ने एका दिवसात या संशयितांशी संबंधित ११ ठिकाणी धाडी टाकल्या. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात असलेल्या जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील १२ संशयितांचा ‘एनआयए’कडून शोध - एका दिवसात ११ ठिकाणी छापेदेशात हिंसक कारवाया करणे, तरुणांना भडकावून त्यांना हिंसेसाठी उद्युक्त करण्याचे प्रकरण गेल्यावर्षी समोर आले होते. काही ओव्हर ग्राऊंड वर्कर अर्थात दहशतवाद्यांना व दहशतवादी संघटनांना छुपे सहाय्य करणारे यामध्ये सहभागी असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या प्रकरणात सू-मोटो अर्थात स्वत:हून दखल घेत ‘एनआयए’ने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गेल्यावर्षी ‘एनआयए’ने या प्रकरणात श्रीनगर, बारामुल्ला, पुलवामा, अनंतनाग, बडगाव, कथुवा या सहा जिल्ह्यात एकूण १४ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये हाती लागलेल्या काही धाग्यादोऱ्यांच्या सहाय्याने ‘एनआयए’ने पुढील तपास सुरू केला होता.

या तपासात आतापर्यंत १२ संशयितांची ओळख ‘एनआयए’ला पटली आहे. हे संशयित दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या हस्तकांशी छुप्या नावाने संपर्कात होते. पाकिस्तानी हस्तकांकडून मिळत असलेल्या इशाऱ्यावर त्यांच्या कारवाया सुरू होत्या. दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा व इतर सहाय्य त्यांच्याकडून पुरविले जात होते. तसेच त्यांच्यापर्यंत दिशाभूल झालेल्या तरुणांची माहिती पोहोचविली जात होती. सुरक्षादलांचे जवान, अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यासाठी, तसेच धार्मिक कार्यक्रमांना लक्ष्य करून तणाव वाढविण्यासाठी आवश्यक असणारी माहितीही या सर्वांकडून पाकिस्तानी हस्तकांना दिली जात होती.

याच प्रकरणात मंगळवारी एनआयएने ११ ठिकाणी छापे टाकले. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये या धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये काही डिजिटल पुरावे आणि बंदी घातलेले साहित्य ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. या ओळख पटविण्यात आलेल्या १२ जणांना शोध सुरू असून या प्रकरणात तपास प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

leave a reply