अणुयुद्धात कोणाचाही विजय होणार नाही

-रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

Putinसंयुक्त राष्ट्रे – अणुयुद्धाचा भडका कधीच उडता कामा नये कारण या युद्धात कोणाचाही विजय होणार नाही, याची जाणीव रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी करून दिली. सोमवारपासून न्यूयॉर्कमध्येे सुरू झालेल्या अण्वस्त्रप्रसारबंदी करारासंदर्भातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी एक पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात त्यांनी अण्वस्त्रप्रसारबंदी कराराचा उल्लेख करून रशिया त्याचे पालन करीत असल्याचे अधोरेखित केले. फेब्रुवारी महिन्यात युक्रेन मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी तसेच नंतर पुतिन यांनी अणुयुद्ध भडकू शकते, असा इशारा दिला होता. युक्रेन संघर्षाला तोंड फुटल्यानंतर त्यांनी रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे आदेशही दिले होते.

nuclear-warसोमवारी सुरू झालेल्या वैठकीदरम्यान संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांसह बहुतांश पाश्चिमात्य देशांनी रशियाची अण्वस्त्रे व युक्रेन संघर्षाचा उल्लेख केला. युक्रेन युद्धादरम्यान रशियाने वारंवार अणुहल्ल्याची धमकी दिल्याने अण्वस्त्रांपासून असलेला धोका अधिकच वाढला आहे, असा दावा अमेरिका व मित्रदेशांकडून करण्यात आला. या देशांनी रशियाकडून सातत्याने करण्यात येणारी वक्तव्ये बेजबाबदार असल्याची टीकाही केली. या पार्श्वभूमीवर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पत्रात करून दिलेली जाणीव लक्ष वेधून घेणारी ठरते.

‘अण्वस्त्रप्रसारबंदी कराराची आखणी व त्याची अंमलबजावणी यात रशियाचा सहभाग आहे. रशिया सातत्याने या कराराचे पालन करीत आहे. जागतिक स्तरावर कधीच अणुयुद्धाला सुरुवात होऊ नये कारण या युद्धात कोणाचाही विजय होणे शक्य नाही’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पत्रात म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष अणयुद्धाचा मुद्दा मांडत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाबरोबर ‘न्यू स्टार्ट’ कराराबाबत बोलणी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका व रशियातील अण्वस्त्रांची संख्या तसेच त्याच्या वापराबाबत करण्यात आलेल्या या कराराला गेल्या वर्षीच तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली होती.

नव्या करारात चीनचाही समावेश असावा, अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे. मात्र चीनने ती धुडकावून लावली आहे.

leave a reply