शत्रुत्व व दुटप्पीपणा सोडला तर उत्तर कोरिया दक्षिण कोरियाशी चर्चा करण्यासाठी तयार

- किम यो जॉंग यांचा दावा

दुटप्पीपणाप्योनग्यँग/सेऊल – दक्षिण कोरियाने शत्रुत्वाचे धोरण, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन व दुटप्पीपणा सोडला तर उत्तर कोरिया पुन्हा दक्षिण कोरियाशी चर्चा करण्यास तयार आहे, असे वक्तव्य उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांची बहीण किम यो जॉंग यांनी केले आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन यांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत केलेल्या भाषणात, दोन्ही कोरियामधील युद्ध संपल्याची अधिकृत घोषणा करावी असा प्रस्ताव दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, किम यो जॉंग यांनी फक्त युद्ध संपल्याची घोषणा पुरेशी नसून दक्षिण कोरियाने धोरणे व दृष्टिकोनही बदलायला हवी, असे म्हटले आहे.

मार्च महिन्यात उत्तर कोरियाने छोट्या पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांच्या तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आण्विक हालचालींमध्ये वाढ झाल्याचा अहवालही अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केला होता. गेल्याच महिन्यात, ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’ची क्षमता अधिक वाढविण्याचा इशाराही उत्तर कोरियाकडून देण्यात आला होता. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यात उत्तर कोरियाने नव्या क्षेपणास्त्र चाचण्या करून अमेरिका व दक्षिण कोरियाबरोबरील दडपण अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला होता. या चाचण्यांच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाकडून धमक्याही देण्यात आल्या होत्या.

त्याचवेळी दुसर्‍या बाजूला अमेरिका व दक्षिण कोरियाने उत्तर कोरियावरील शांतीचर्चा सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे दूत जपान व दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावही दाखल झाले होते. यावेळी अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया व चीनमध्ये कोरियन क्षेत्रात शांतीचर्चा सुरू व्हावी म्हणून बोलणीही झाली होती. मात्र त्यालाही उत्तर कोरियाने फारसा प्रतिसाद दिला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन देशांमधील युद्धाची अखेर व्हावी यासंदर्भात मांडलेला प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

या प्रस्तावावर सुरुवातीला उत्तर कोरियाने नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. उत्तर कोरियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव अकाली असून अमेरिकेच्या शत्रुत्वपूर्ण धोरणामुळे अशा प्रस्तावाला अर्थ नसल्याचे बजावले होते. मात्र त्यानंतर काही तासातच उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांची बहीण किम यो जॉंग यांनी, चर्चेस तयार असल्याची माहिती दिली. मात्र त्यासाठी दक्षिण कोरियाने आपले शत्रुत्वाचे धोरण सोडण्याची अटही घातली आहे. युद्धाची अखेर करण्याची घोषणा नव्या संघर्षाचे बीज ठरु शकते, असे किम यो जॉंग यांनी बजावले.

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांच्यादरम्यान झालेली बैठक अपयशी ठरली होती. त्यानंतर दोन देशांमधील चर्चा पूर्णपणे थांबली आहे. अमेरिकेकडून अनेकदा चर्चेची तयारी दर्शविण्यात आली असली तरी उत्तर कोरियाने त्यासाठी घातलेल्या अटी मान्य करण्याचे नाकारले आहे.

leave a reply