युरोपच्या सुरक्षेसाठी ‘न्यूक्लिअर डिटरन्स’ निर्णायक

- जर्मन संरक्षणमंत्री ख्रिस्तिन लॅम्ब्रेक्ट यांचा दावा

बर्लिन – युरोप खंडाच्या सुरक्षेसाठी आण्विक तैनाती निर्णायक असून नजिकच्या भविष्यात त्याला पर्याय नाही, असा दावा जर्मनीच्या संरक्षणमंत्री ख्रिस्तिन लॅम्ब्रेक्ट यांनी केला. गेल्या दशकात जर्मन संसदेने देशातील अमेरिकेची अण्वस्त्रे इतर देशांमध्ये हलविण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री लॅम्ब्रेक्ट यांचे वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

‘जर्मन सोसायटी ऑन फॉरेन रिलेशन्स’ या अभ्यासगटाच्या कार्यक्रमादरम्यान संरक्षणमंत्री लॅम्ब्रेक्ट यांनी युरोपातील अण्वस्त्रांबाबत भूमिका मांडली. ‘अमेरिकेने युरोपात तैनात केलेली अण्वस्त्रे या खंडाला ब्लॅकमेल होण्यापासून दूर ठेवणारा घटक आहे. नजिकच्या भविष्यात त्याला पर्याय नाही. त्यामुळे युरोपिय देशांनी कोणतीही किंमत मोजून अण्वस्त्रांची तैनाती कायम ठेवायला हवी. त्यासाठी अमेरिका व नाटोला सहकार्य करायला हवे’, असे जर्मन संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

नाटोच्या ‘न्यूक्लिअर अम्ब्रेला’ला सर्व देशांनी समर्थन तसेच सहाय्य पुरवायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. जर्मनीने नुकताच अमेरिकेकडून अण्वस्त्र तैनातीची क्षमता असणाऱ्या ‘एफ-३५’ लढाऊ विमानांच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. अमेरिकेने युरोपिय देशांमध्ये सुमारे १८० अण्वस्त्रे तैनात केली असून त्यातील २० अण्वस्त्रे जर्मनीतील संरक्षणतळावर ठेवण्यात आली आहेत. जर्मनीव्यतिरिक्त ब्रिटन, इटली, नेदरलॅण्ड्स, बेल्जियम तसेच तुर्कीतील तळांवर अमेरिकी अण्वस्त्रे तैनात आहेत.

leave a reply