पंचवीस दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रतिदिनी २० हजारांवरून लाखावर

नवी दिल्ली – देशात प्रथमच चोवीस तासात एक लाखाहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच ४७८ जण दगावले. केवळ २५ दिवसात दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० हजारावरून एक लाखावर पोहोचली आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेने शिखर गाठलेले असताना २० हजारावरून ९७,८९४ हा त्यावेळचा एका दिवसातील नव्या रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्यासाठी ७६ दिवस लागले होेते. यावरून देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा वेग किती भयंकर आहे, हे लक्षात येते. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्रात रविवारी एका दिवसात ५७ हजार इतका उच्चांक नोंदविल्यावर सोमवारी ४७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५५ जणांचा बळी गेला. मुंबईत सुमारे १० हजार नवे रुग्ण आढळले. दिल्लीतही ३५०० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. मध्य प्रदेशात ३३९८ नवे रुग्ण सोमवारी सापडले. गुजरातमध्ये ३३६० कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशात सुमारे चार हजार नवे रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असल्याने देशातील कोरोनाचे रुग्ण बरा होण्याचा दर ९२.८० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी १६ लाख ८२ हजार १३६ वर पोहोचली आहे. गेल्यावर्षी ७ ऑगस्टला भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाखांवर पोहोचली होती. तर २३ ऑगस्ट रोजी ती ३० लाखांवर गेली. ५ सप्टेंबरला ४० लाख, १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख आणि २९ ऑक्टोबरला कोरोनाची ही रुग्णसंख्या ८० लाखांवर गेली. तर तेथून २० नोव्हेबरला ९० लाखांवर पोहोचली, तर १९ डिसेंबरला देशातील रुग्णसंख्येने १ कोटीची संख्या ओलांडली. त्यानंतर देशात रुग्णवाढीचा दर खूप कमी झाला होता. पण आता त्यामध्ये पुन्हा भरमसाठ वाढ दिसत असून चिंता पुन्हा वाढल्या आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात घालण्यात आलेल्या निर्बंधांची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. व्यापारी, तसेच मजुर वर्गाकडून काही ठिकाणी या निर्बंधांना विरोध करण्यात येत आहे.

leave a reply