पूर्व युरोपातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन कोटींवर

- युरोपमधील साथीची तीव्रता वाढत असल्याचा ‘डब्ल्यूएचओ’चा दावा

मॉस्को – शिथिल झालेले निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपातील कोरोनाच्या साथीची तीव्रता अधिकच वाढली आहे. सलग चार आठवडे युरोपातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून अवघ्या दोन आठवड्यांमध्ये १५ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपच्या पूर्व भागाला सर्वाधिक फटका बसला असून या क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींवर गेली आहे. रोमानियात ‘इमर्जन्सी बेड्स’ पूर्ण क्षमतेने भरले असून रशियात सलग पाच दिवस बळींच्या संख्येत वाढ होत आहे.

पूर्व युरोपातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन कोटींवर - युरोपमधील साथीची तीव्रता वाढत असल्याचा ‘डब्ल्यूएचओ’चा दावायुरोपातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सात कोटींवर गेली असून या साथीने बळी घेतलेल्यांची संख्या १४ लाखांनजिक पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुमारास अनेक युरोपिय देशांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर युरोपातील अनेक देश पर्यटनासह इतर विविध क्षेत्रांसाठी खुले झाले होते. विविध युरोपिय देशांमध्ये सांस्कृतिक तसेच सार्वजनिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजनही सुरू झाले होते. त्यामुळे कोरोनाच्या साथीची तीव्रता पुन्हा वाढू लागल्याचे समोर येत आहे.

ब्रिटनपासून रशियापर्यंत बहुतांश प्रमुख देशांमध्ये साथीची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने दिलेल्या माहितीनुसार, गेले चार आठवडे सलग युरोपातील रुग्णांची व बळींची संख्या वाढत आहे. जगभरातील प्रमुख खंडांमध्ये कोरोनाची तीव्रता घटत असताना फक्त युरोप खंडातच संक्रमण वाढत असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने निदर्शनास आणून दिले. युरोपमधील थंडीच्या मोसमाला झालेली सुरुवात हादेखील वाढत्या फैलावासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले.

पूर्व युरोपातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन कोटींवर - युरोपमधील साथीची तीव्रता वाढत असल्याचा ‘डब्ल्यूएचओ’चा दावाब्रिटनमध्ये गेले काही दिवस सातत्याने ४० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून बळींची संख्याही प्रतिदिन १००च्या वर गेल्याचे समोर येत आहे. ब्रिटनबरोबरच जर्मनी, बेल्जियम, हंगेरी तसेच पूर्व युरोपातील रोमानिया, युक्रेन व रशियामध्ये साथीची तीव्रता वाढत चालली आहे. जर्मनीत गेल्या आठवड्यात २४ तासांमध्ये २० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. लाटव्हियाने कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी एक महिना निर्बंध लादत असल्याचे जाहीर केले आहे.

रशियामध्ये शनिवारी ३७ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतरचा हा उच्चांक ठरतो. मंगळवार ते शनिवार सलग पाच दिवस रशियातील बळींची संख्याही वाढताना दिसत आहे. शनिवारी रशियात १,०७५ जणांचा बळी गेला. रशियातील रुग्णांची एकूण संख्या ८२ लाखांवर गेली असून दोन लाख, २९ हजार, ५२८ जणांचा बळी गेला आहे.

युक्रेनमधील कोरोना रुग्णांची संख्या २७ लाखांवर गेली असून, ६३ हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. संथ लसीकरण हे युक्रेनमधील साथीची तीव्रता वाढण्यामागील प्रमुख कारण ठरले आहे. आतापर्यंत युक्रेनमधील फक्त १५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून हा युरोपमधील नीचांक मानला जातो. रोमानियात दर पाच मिनिटाला एका कोरोना बळीची नोंद होत असून ‘आयसीयु बेड्स’ व शवगृहे पूर्ण भरल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे.

leave a reply