देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दीड लाखांवर

- महाराष्ट्रात चोवीस तासात ९७ जण दगावले

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या चाचण्या वाढत आहेत, त्याच प्रमाणात देशभरातील या साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. गेल्या १५ दिवसात देशात ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाने दगावत असलेल्या रुग्णांचा दर ३.३ टक्क्यांवरून २.८७ टक्के इतका खाली आला असल्याचे आरोग्यमंत्रालयाचे जाहीर केले. ही सकारात्मक बातमी येत असताना मंगळवारी रात्री महाराष्ट्र सरकारने राज्यात एका दिवसात ९७ रुग्ण दगावल्याचे घोषित केले आहे. चोवीस तासात इतक्या कोरोना रुग्णांचा बळी जाण्याचा हा राज्यातील उच्चांक ठरतो. यामध्ये मुंबईतील ३९, ठाण्यातील १५ आणि कल्याण-डोंबिवलीत १० जणांचा बळींचा समावेश आहे.

सध्या देशात दिवसाला एक लाख १० हजार कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. आतापर्यंत देशात ३१ लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच देशात या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाऊन दरम्यात ७ टक्क्यांने वाढून ४१.६१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जगात या साथीमुळे दगावत असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर ६.४५ पर्यंत पोहोचला असताना भारतात हा मृत्यूदर घसरून २.८७ पर्यंत खाली आल्याची सकारात्मक माहितीही आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. देशात या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या चोवीस तासात १४६ ने वाढून ४,१६७ वर पोहोचली आहे, तर मंगळवारी सकाळपर्यंत रुग्णांची संख्या १,४५,३८० वर पोहोचल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. एका दिवसात रुग्णांची संख्या ६,५३५ ने वाढली आहे.

मात्र मंगळवारी रात्रीपर्यंत देशातील रुग्ण संख्या एक लाख ५० हजारांच्या जवळ पोहोचल्याचे उघड होते. मंगळवारी या साथीने महाराष्ट्रात ९७ जणांचा बळी गेला. यामुळे राज्यातील या साथीने दागवलेल्यांची संख्या १८०० जवळ पोहोचली आहे. तसेच दिवसभरात राज्यात २०९१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ५४,७५८ वर पोहोचली आहे. मुंबईत चोवीस तासात १००२ नव्या रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, तामिळनाडूत एका दिवसात ६४६ नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये ३६१, मध्यप्रदेशात ३०५, राजस्थानात २३६, कर्नाटकात १०१, जम्मू काश्मीरमध्ये ९१, तेलंगणात ७१, केरळात ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

leave a reply