कोरोनाव्हायरसच्या युरोपमधील बळींची संख्या अधिकच वाढली

ब्रुसेल्स – जगभरात कोरोनाव्हायरसमुळे ३५ हजाराहून अधिक जण दगावले असून यामध्ये युरोपातील बळींचे प्रमाण दोन तृतियांश आहे. युरोपिय देशांमध्ये जवळपास २४ हजार जण या साथीत बळी गेल्याचे युरोपिय महासंघाने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. तर या साथीचे उगमस्थान ठरलेल्या चीनच्या शेजारी असलेल्या आग्नेय आशियाई देशांमध्ये या साथीचे रुग्ण कमी असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते.

कोरोनाव्हायरसच्या साथीने आतापर्यंत जगभरात ३५,०३५ जण मृत्यूमुखी पडले असून या साथीच्या रुग्णांची संख्या ७,४०,२३९ वर गेली आहे. यापैकी २८ हजाराहून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. युरोपमध्ये या साथीने २३,९६६ जणांचा बळी घेतला असून ३,९३,२८५ जणांना या साथीची लागण झाली आहे.

युरोपमधील इटली हा या साथीने सर्वाधिक ग्रासलेला देश आहे. गेल्या चोवीस तासात इटलीमध्ये ७५६ जणांचा बळी गेला असून एकट्या लॉम्बार्डी प्रांतातील ४१६ जणांचा समावेश आहे. या देशात एकूण १०,७७९ जण यात दगावले तर ‘अतिदक्षता विभागा’तील ३९०६ जणांची प्रकृती गंभीर आहे. या साथीचा फैलाव रोखण्यासाठी इटलीने काही महत्त्वाच्या शहरांच्या सीमेवर सुरक्षादल तैनात केले आहे.

स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासातील सर्वाधिक बळींची नोंद झाली असून ८३८ जण दगावले आहेत. तर ६,३९८ नवे रुग्ण आढळले आहेत. स्पेनच्या सरकारने पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढविला आहे. तर गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये २९२ जण दगावले असून तीन हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचे उघड झाले आहे.

इटली, फ्रान्स आणि स्पेन या देशांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना दगावलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद केलेली आहे. मात्र वृद्धाश्रमात दगावलेल्या या साथीच्या रुग्णांचा यात समावेश नाही. ती संख्या जोडली तर या साथींच्या बळींचे प्रमाण अधिकच वाढेल, असे या देशांमधील माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply