देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली

- पंतप्रधानांकडून तयारीचा आढावा

मुंबई – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचे एकाच दिवसात तमिळनाडूत ३३, महाराष्ट्रात २३, कर्नाटकामध्ये १२, केरळात ५ नवे रुग्ण आढळल्यावर देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ३०० वर पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील कोरोना स्थितीचा व यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्र सरकारने याआधीच राज्य सरकारांना रात्रीची संचारबंदी, कन्टेन्मेंट झोन बनविण्यासारख्या उपाययोजना हाती घेण्याचे व कार्यालय उपस्थिती व सार्वजनिक वाहतूक सेवेतील प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आणण्याच्या सूचना केल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने गुरुवारी राज्यात नाईट कर्फ्युची घोषणा केली. नव्या परिस्थिती केंद्राच्या सूचनेनंतर राज्यात सर्वत्र नाईट कर्फ्यु लावणारे मध्य प्रदेश पहिले राज्य ठरले आहे.

देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली - पंतप्रधानांकडून तयारीचा आढावाजगभरात ओमिक्रॉनने आलेल्या नव्या लाटेने हाहाकार उडविला असताना व कित्येक देशांवर पुन्हा लॉकडाऊनसारखे उपाय करण्याची वेळ आली असताना भारत सरकार सावधपणे पावले टाकत आहे. ओमिक्रॉनला वेळीच थोपविण्यासाठी राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांना पुन्हा एकदा केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचा विचार करून झपाट्याने पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. सध्याच्या कोरोना स्थितीचा व रुग्ण वाढल्यास यंत्रणांच्या तयारीचा यामध्ये आढावा घेण्यात आला.

या बैठकीनंतर मध्य प्रदेश सरकारने आपल्या राज्यात नाईट कर्फ्युसह इतर निर्बंधांची घोषणा केली आहे. केंद्राच्या सूचनेनुसार सभा, सभारंभामधील व कार्यालयांमधील उपस्थितींवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. याआधी कर्नाटक व गुजरात सरकारने काही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यु लावला होता. मात्र ही राज्यही लवकरच केंद्राच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात उपाययोजना हाती घेतली, असे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा रात्रीच्या संचारबंदीसह इतर उपाययोजनांचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे हजाराहून अधिक रुग्ण आढळले. मुंबईतील रुग्णांमध्येही वाढ दिसून आली. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांचे निम्मे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत गुरुवारी ६०० रुग्णांची नोंद करण्यात आली. दक्षिण मुंबईत रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. त्याचवेळी राज्यात ओमिक्रॉनच्या २३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून यातील मुंबईत पाच तर पुण्यात १३, उस्मानाबादमध्ये दोन, तर ठाणे, नागपूर व मिरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.

leave a reply