ओहिओ ट्रेन दुर्घटना अमेरिकेसाठी चेर्नोबिल ठरेल

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे ताशेरे

बीजिंग – स्पाय बलूनच्या नावाने गळे काढणारी अमेरिका आपल्याच देशातील ओहिओ प्रांतातील ट्रेनच्या दुर्घटनेकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे विषारी रसायने जवळच्या नदीत मिसळली असून पुढील २० वर्षांसाठी तरी याचे भयावह परिणाम स्थानिकांना भोगावे लागू शकतात. ही दुर्घटना अमेरिकेचे चेर्नोबिल ठरू शकते. पण अमेरिका व पाश्चिमात्य माध्यमे याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करीत आहे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

३ फेब्रुवारी रोजी विषारी रसायनांनी भरलेली मालवाहू ट्रेन ओहिओ प्रांताच्या ‘ईस्ट पॅलेस्टाईन’ भागातून प्रवास करीत होती. या ट्रेनमधील १५० डब्ब्यांपैकी जवळपास ५० डब्बे रुळावरुन घसरले. यातील पाच डब्ब्यांमधील विनील क्लोराईड हवेत मिसळून मोठा स्फोट झाला. ज्वलनशील असलेल्या या रसायनामुळे काही कळायच्या आतच भडका उडाला आणि त्याचे हादरे अतिदूर बसले. या स्फोटाच्या ज्वाळा आणि धूराचे लोट दूर अंतरावरुनही दिसत होते.

ट्रेनमधील कर्मचाऱ्यांनी आगीवर ताबा मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण स्फोटाची तीव्रता मोठी असल्यामुळे त्यांना यात अपयश मिळाले. त्यामुळे पुढील काही तास या विषारी धूराचे लोट आसपासच्या शहरांमध्ये पसरल्याचा दावा केला जातो. या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक यंत्रणानी नागरिकांसाठी अलर्ट जारी केला होता. किमान चार दिवस स्थानिकांना दुर्घटनेच्या स्थळापासून दूर राहण्याची सूचना अमेरिकन यंत्रणांनी केली होती.

या दुर्घटनेमुळे नदीत मिश्रीत झालेले किंवा हवेत मिसळलेले रसायन अजिबात धोकादायक नसल्याचा दावा अमेरिकन यंत्रणा करीत आहेत. पण या रसायनाच्या गंधाने डोकेदुखी सुरू झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. असे असताना अमेरिका व पाश्चिमात्य माध्यमे ओहिओ ट्रेन दुर्घटना व त्याचे परिणाम दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. सदर दुर्घटना अमेरिकेसाठी चेर्नोबिल ठरू शकते व पुढील २० वर्षांसाठी याचे परिणाम अमेरिकन जनतेला भोगावे लागू शकतात, असा इशारा चीनने दिला आहे.

दरम्यान, १९८६ साली तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या चेर्नोबिल अणुप्रकल्पातील चौथ्या क्रमांकाच्या अणुभट्टीमध्ये भीषण गळती झाली होती. यामुळे किमान ५० जणांचा बळी गेला होता. पण अजूनही या भागात आण्विक गळती सुरू असून त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो, असा दावा केला जातो.

leave a reply