‘ओमिक्रॉन’मुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती

नवी दिल्ली – कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिअंट आल्यानंतर त्याचे संक्रमण भारतात पसरू नये यासाठी सुरक्षाउपाय करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वीच सरकारने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा व्यावसायिक पातळीवर पुन्हा सुरू होईल, अशी घोषणा केली होती. मात्र ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिअंटबद्दल जगभरातून चिंता व्यक्त करण्यात आल्यावर पंतप्रधानांनी तातडीच्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर फेरविचार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या. तेव्हापासूनच हा निर्णय टाळला जाऊ शकतो, असा अंदाज बांधण्यात येत होता.

‘ओमिक्रॉन’मुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगितीभारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण सतत कमी होत आहे. सध्याची स्थिती पाहता गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करून नागरी उड्डयन विभागाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. देशात सर्व गोष्टी पूर्ववत होत असताना आंतरराष्ट्रीय विमानसेवाही या निर्णयानुसार १५ डिसेंबरपासून पूर्ववत होणार होती. केवळ कोरोनाची साथ असलेल्या व ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटचे रुग्ण आढळलेल्या देशांना विमानसेवा सामान्य होण्याच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले होते.

गेल्यावर्षी २३ मार्च रोजी या आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध टाकण्यात आले होते. केवळ परदेशात आढळणार्‍या भारतीयांना परत आणण्यासाठी काही विमाने लॉकडाऊनच्या काळात चालविण्यात आली. तर पहिली लाट ओसरल्यावर काही देशांबरोबर एअरबबल करार करून काही ठराविक फेर्‍या व ठराविक कालावधीत सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या ३१ देशांबरोबर एअरबबलअंतर्गत ठराविक विमाने ये-जा करतात.

‘ओमिक्रॉन’मुळे सध्या हीच व्यवस्था आणखी काही कालावधीसाठी कायम राहणार आहे. १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

leave a reply