देशात सहा दिवसात १० लाख जणांना कोरोनाची लस

नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर केवळ सहा दिवसात दहा लाख जणांना लसीकरण झाल्याचे केंेद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. आतापर्यंत सुमारे १६ लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली असून भारतातील लसीकरण मोहिम जगात सर्वात वेगाने सुरू असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधोरेखित केले.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशात ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर अवघ्या १५ दिवसात देशात कोरोनाच्या लसीकरणाची मोहिम सुरू झाली. मोहीम सुरू करण्यापूर्वी देशात सर्व राज्यांमध्ये तीन टप्प्यात ड्राय रनही घेण्यात आली होती. कोरोनाच्या लसींना मंजुरी देण्याआधीच दोन महिन्यांपासून हा कार्यक्रम कसा राबवायचा याची तयारी करण्यात आली होती. आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले होते. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबविली जाणार असल्याने सार्‍या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

या पार्श्‍वभूमीवर भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन आखणीनुसार योग्य रितीने होत असल्याचे अधोरेखित करणारी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. १६ तारखेला देशव्यापी कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात देशातील १० लाख डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व इतर फ्रन्टलाईन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण झाले. २४ जानेवारीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १५ लाख, ८२ हजार, २०१ जणांना कोरोनाची लस देण्यात आली.

भारतात लसीकरणाचा हा वेग जगात सर्वात जास्त आहे. जगात सर्वात प्रथम ब्रिटनमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू झाले होते. लसीकरण सुरू झाल्यानंतर दहा लाख जणांना लस देण्यासाठी ब्रिटनला १८ दिवस लागले होते. तर अमेरिकेने १० दिवसात हा टप्पा पूर्ण केला होता, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

लसीकरणाची मोहीम सुरू असतानाच देशात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सध्या देशात कोरोनाचे १ लाख ८४ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत देशभरात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १.७३ टक्के आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात १५ हजार ९४८ रुग्ण बरे झाले, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

leave a reply