पाकिस्तानच्या दहशतवादी थापेबाजीला इतर देशांनी बळी पडता कामा नये

- ‘तेहरिक-ए-तालिबान’चे आवाहन

इस्लामाबाद – पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे भीषण सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, इटली व ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया या देशांच्या पाकिस्तानातील दूतावासांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनीही परदेशी दूतावासांना कडेकोड सुरक्षा पुरविण्याची घोषणा केली होती. पण पाकिस्तान करीत असलेल्या या थापेबाजीला बळी पडू नका, असे आवाहन ‘तेहरिक-ए-तालिबान’ने केले आहे. जनतेवर अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानी लष्करावरच आम्ही हल्ले चढवित आहोत, सर्वसामान्य जनता व परदेशी दूतावास हे काही आमचे लक्ष्य नाही, असे ‘तेहरिक’च्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. आपण दहशतवादाचे बळी ठरत असल्याचे दाखवून पाकिस्तान इतर देशांकडून पैसे उकळू पाहत आहे, तेव्हा पाकिस्तानच्या अपप्रचाराला बळी पडून या देशाला सहाय्य करू नका, असे आवाहन तेहरिकच्या प्रवक्त्याने इतर देशांना केले आहे.

एकेकाळी दहशतवादी संघटनांचे भरणपोषण करणाऱ्या पाकिस्तानवरच आता दहशतवादी संघटना उलटल्या आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानची पाकिस्तानातील शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘तेहरिक’ने पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांची रक्तरंजित मालिका सुरू केली आहे. यात दरदिवशी पाकिस्तानी लष्कर व निमलष्करी दलाच्या जवानांचा बळी जात आहे. इतकेच नाही तर अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर सुमारे आठ ते दहा हजार इतक्या संख्येने तेहरिकचे दहशतवादी तयार असल्याचा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी केला आहे. हे दहशतवादी त्यांच्या कुटुंबासह इथे असून त्यांची संख्या 25 हजारांच्या आसपास असल्याची माहितीही राणा सनाउल्लाह यांनी दिली. त्याचवेळी दहशतवादाचा बिमोड करण्याची ग्वाही पाकिस्तानी लष्कराने दिलेली आहे, अशी घोषणाही या देशाच्या गृहमंत्र्यांनी केली.

आपल्या देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा दाखला देऊन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण दहशतवादाचे शिकार ठरत असल्याचा दावा ठोकत आहे. राजधानी इस्लामाबादमधल्या मेरियट या पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची शक्यता वर्तवून अमेरिकेच्या दूतावासाने आपल्या कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन, इटली ऑस्ट्रेलिया व सौदी अरेबिया या देशांनीही पाकिस्तानातील आपल्या कर्मचाऱ्यांना आवश्यकता असल्याखेरीज बाहेर न पडण्याची सूचना केली होती. मात्र हा सारा पाकिस्तानचाच बनाव असल्याचा आरोप ‘तेहरिक’चा प्रवक्ता मोहम्मद खोरासानी याने केला. आपली संघटना केवळ पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनाच लक्ष्य करीत आहे, कारण हे लष्कर सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करते, असा दावा खोरासानी याने केला.

इतकेच नाही तर आपण दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरत असल्याचे दाखवून पाकिस्तान इतर देशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपकाही खोरासानीने ठेवला आहे. पण इतर देशांनी पाकिस्तानच्या या थापेबाजीला बळी पडून तेहरिकच्या विरोधात या देशाला सहाय्य करू नये, असे आवाहन खोरासानीने केले. याबरोबरच पाकिस्तानने तालिबानला आपला ताबा घेण्याची विनंती केली तरी तालिबान हा प्रस्ताव मान्य करणार नाही, असा दावा तालिबानच्या एका कमांडरने केला.

पाकिस्तानचा ताबा घेतला तर त्याचे कर्ज फेडावे लागेल आणि त्याला कोण तयार होईल? असा सवाल या कमांडरने केला आहे. त्यामुळे पाकिस्तान फुकटात मिळाले तरी ते आम्हाला नको आहे, असा टोला या तालिबानच्या कमांडरने लगावला. मात्र ज्या भूभागावर अफगाणी जनतेचा अधिकार आहे, तो अटकपर्यंतचा भूभाग तालिबान परत मिळविल, असे या कमांडरने बजावले आहे.

leave a reply