भारताच्या ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर’पासून इतर देशांनी धडे घ्यावे

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सल्ला

नवी दिल्ली – ‘स्टॅकिंग अप द बेनिफिट्स: लेसन्स फ्रॉम इंडियाज्‌‍ डिजिटल जर्नी’, असे शीर्षक असलेला अहवाल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तयार केला आहे. या भारताने आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिजिटल इन्फ्रान्स्ट्रक्चर तयार केल्याचे सांगून यासाठी भारताची प्रशंसा केली आहे. डिजिटल इन्फ्रान्स्ट्रक्चर विकसित करून भारताने कोट्यवधी जणांचे आयुष्य पालटून टाकले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा यामुळे कायापालट झाला आहे. यातून इतर देशांना धडा घेता येईल, असा दावा नाणेनिधीने सदर अहवालात केला आहे.

भारताच्या ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर’पासून इतर देशांनी धडे घ्यावे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सल्लाआधार, युपीआय इत्यादींसाठी भारताने पुढाकार घेऊन आपले डिजिटल इन्फ्रान्स्ट्रक्चर विकसित केले. याचे फार मोठे लाभ भारताला मिळत असून भारताची अर्थव्यवस्था यामुळे गतीमान बनली आहे, असा दावा नाणेनिधीने सदर अहवालात केला. पेपरलेस, कॅशलेस आणि खाजगी माहिती उघड न करण्याची दक्षता बाळगून ऑनलाईन पेमेंट सिस्टीम, भारताने सुरू केली. याचा भारताच्या सरकारी व खाजगी क्षेत्राला फार मोठा फायदा झाला. विशेषतः कोरोनाची साथ आली, त्यावेळी भारताला या डिजिटल पातळीवरील व्यवहारांचा विशेष फायदा झाल्याचे दिसत आहे, अशी नोंद देखील सदर अहवालात करण्यात आलेली आहे.

आधार कार्डामुळे गरजूंच्या खात्यात सरकारकडून थेट सहाय्य पोहोचविले जात होते. यामुळे भ्रष्टाचार व गैरव्यवहाराला थारा मिळाला नाही, याकडेही सदर अहवालात विशेष लक्ष देण्यात आले. विशेषतः साथीच्या काळात भारतातील गरीबांचे जीवन अधिक सुकर झाले. कोरोनाच्या साथीच्या पहिल्या काही महिन्यात भारतातील ८७ टक्के गरीबांपर्यंत सरकारची मदत पोहोचली होती, ही बाब सदर अहवालात आवर्जून मांडण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर भारत हा ‘ब्राईट स्पॉट’ अर्थात लखलखणारा तारा असल्याचे म्हटले होते. गेल्या काही वर्षात भारताने विकसित केलेले डिजिटल इन्फ्रान्स्ट्रक्चर भारताच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याची नोंद नाणेनिधी तसेच जागतिक बँकेसह जगभरातील अर्थतज्ज्ञांनीही केली होती. आता भारताने या क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारापासून इतर देशांनाही धडा घेण्याची गरज आहे, असे सांगून नाणेनिधीने याचे महत्त्व अधोरेखित केल्याचे दिसते आहे.

हिंदी English

 

leave a reply