जगभरात कोरोनाव्हायरसचे ७० हजाराहून अधिक बळी

पॅरिस/टोकियो – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने जगभरात पाच हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला असून जगभरात या साथीने एकूण ७०,५५९ जण दगावले आहेत. अमेरिकेत बळींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तर युरोपिय देशांनी आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचा दावा केला आहे. पण चीनमध्ये या साथीचे नवे रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, जपानने सहा महिन्यांसाठी इमर्जन्सी जाहीर करण्याचे संकेत दिले असून पंतप्रधान अॅबे शिंजो यांनी ९९० अब्ज डॉलर्सची तरतूद जाहीर केली.

जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमेरिकेत १२०० हून अधिक जणांचा बळी गेला. तर २४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. न्यूयॉर्क शहरातच चोवीस तासात ६०० जण दगावले असून ७३०० नवे रुग्ण आढळले आहेत. या साथीने अमेरिकेत एकूण ९६३३ जण दगावले असून या साथीचे ३,३६,९०६ रुग्ण आहेत. न्यूयॉर्कमधील प्राणीसंग्रहालयात एका वाघालाही या कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या साथीचा प्रादुर्भाव प्राण्यांना होत नसल्याचे दावे निकालात निघाले आहेत.

गेल्या चोवीस तासात या साथीने स्पेनमध्ये ६३७ जणांचा बळी घेतला, तर ४२७३ नवे रुग्ण आढळेल आहेत. स्पेनमध्ये एकूण १३,०५५ जणांचा बळी गेला असून या साथीचे १,३५,०३२ रुग्ण आहेत. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळेल असले तरी, स्पेनचे सरकार या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करीत आहे. पण स्पेनमधील वैद्यकीय तज्ञांचे मत वेगळे असून आपल्या देशातील वैद्यकीय यंत्रणांच्या व्यवस्थापनावर हे तज्ञ नाराजी व्यक्त करीत आहेत.

इटलीमध्येही एका दिवसात सुमारे ६०० जण दगावल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इटलीच्या सरकारने या साथीतील बळींच्या संख्येत घट झाल्याचा दावा केला आहे. पण इटलीचे सरकार रुग्णालयात बळी जात असलेल्यांची माहिती देत आहे. या साथीने घरी दगावलेल्यांचे तपशील दिले जात नसल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. ही संख्या विचारत घेतल्यास इटलीमधील बळींची संख्या दुप्पटीने वाढेल, असे या स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.

फ्रान्समध्ये या साथीने गेल्या चोवीस तासात ५५० जणांचा बळी घेतला. या देशातील एकूण बळींची संख्या आठ हजारावर पोहोचली आहे. या साथीत बळी जाणार्‍यांची संख्या भयावहरित्या वाढत असताना फ्रान्सच्या अर्थमंत्र्यांनी दिलेल्या इशार्‍याचे गांभीर्य वाढले आहे. ‘२००८ साली जगात आर्थिकमंदी आली होती तेव्हा, फ्रान्सचा विकासदर उणे २.२ टक्क्यांपर्यंत घसरला होता. पण या कोरोनाव्हायरसमुळे फ्रान्समध्ये केलेले लॉकडाउन आणखी एखादा महिना कायम राहिले तर, फ्रान्सला दुसर्‍या महायुध्दानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिकमंदीचा सामना करावा लागेल’, असे फ्रान्सचे अर्थमंत्री ‘ब्रुनो ली मेर’ यांनी बजावले आहे.

जगभरातील सर्व देश कोरोनाव्हायरसशी लढण्यात व्यस्त असताना, या साथीच्या पुढच्या टप्प्यातील विषाणूने चीनमध्ये शिरकाव केल्याचे दावे पाश्चिमात्य वृत्तवाहिन्या करू लागल्या आहेत. तर जपानचे पंतप्रधान अॅबे शिंजो यांनी पुढील सहा महिन्यांसाठी इमर्जन्सीचे संकेत दिले. तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी ९९० अब्ज डॉलर्सची तरतूद जाहीर केली.

दरम्यान, इराणमध्ये या साथीमुळे सर्वाधिक ३७३९ जण दगावले असून लॅटीन अमेरिकेतील ब्राझिलमध्ये या साथीने ४८९ जणांचा बळी घेतला आहे. आफ्रिकेतील अल्जेरियामध्ये १५२ जण दगावले असून आग्नेय आशियाई देशांमधील इंडोनेशियात २०९ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला आहे.

leave a reply