पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताबरोबरील संबंध सुधारण्यासाठी दडपण टाकले होते

- माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

लाहोर – आपण पंतप्रधान असताना त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी दडपण टाकले होते. मात्र आपण ही बाब मानली नाही. जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने पुन्हा लागू केल्याखेरीज भारताशी चर्चा शक्य नाही, अशी ठाम भूमिका आपण स्वीकारली, असा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. सध्या पाकिस्तानात गव्हाचे पीठ मिळविण्यासाठी लागलेल्या रांगेत आत्तापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. पाकिस्तानचे भारताबरोबर संबंध चांगले असते, तर ही वेळ आपल्या देशावर ओढावली नसती. मात्र या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत, हे माजी पंतप्रधान इम्रान खान जाहीररित्या सांगून त्यावर अभिमान व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानच्या राजकारणाचा घसरलेला स्तर यामुळे पुन्हा एकदा जगजाहीर झाला आहे.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताबरोबरील संबंध सुधारण्यासाठी दडपण टाकले होते - माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावालाहोरमधील झमान पार्क येथे एका मुलाखतीत बोलताना इम्रान खान यांनी माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्यावर टीकेची झोड उठविली. बाजवा यांना भारताबरोबर उत्तम संबंध प्रस्थापित करायचे होते. त्यासाठी त्यांनी माझ्यावर दडपण टाकले. पण मी त्यांचे म्हणणे मानले नाही, असे सांगून इम्रान खान यांनी आपल्या घोडचुकीची मोठ्या अभिमानाने कबुली दिली. सध्या पाकिस्तानातील कट्टर भारतद्वेष्टे म्हणून ओळखले जाणारे पत्रकार व विश्लेषक देखील आपल्या देशाची नाजूक स्थिती पाहून, भारताशी संबंध सुधारण्याची मागणी करीत आहेत. भारताशी संबंध सुरळीत झाले तर सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेला गव्हातांदळापासून ते भाजीपाल्यापर्यंतच्या साऱ्या गोष्टी स्वस्तात उपलब्ध होतील, याची जाणीव या भारतद्वेष्ट्यांनी झालेली आहे. इतकेच नाही, तर श्रीलंका, नेपाळ व बांगलादेश या शेजारी देशांना अब्जावधी डॉलर्सचे सहाय्य पुरविणारा भारत पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही वाचवू शकतो, हे देखील हा भारतद्वेष्टा गट मान्य करू लागला आहे.

म्हणूनच भारताने पाकिस्तानला सहाय्य करावे, अशी मागणी पाकिस्तानात सुरू झाली आहे. इतकेच नाही तर भारताला प्रगतीपथावर नेणाऱ्या नेतृत्त्वाचे पाकिस्तानात कौतुक सुरू झाले आहे. भ्रष्ट आणि सुमार बुद्धिमत्ता असलेल्या नेत्यांमुळे पाकिस्तानची ही अवस्था झाली. एकीकडे भारत आंतरराष्ट्रीय पटलावर महासत्ता म्हणून उदयाला येण्याच तयारी करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान एक अब्ज डॉलर्सच्या कर्जसहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे याचना करीत आहे. ही तफावत पाकिस्तानी जनतेच्या नजरेत भरणारी असून भारताच्या आर्थिक तसेच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीकडे पाकिस्तानची जनता हताशपणे पाहत आहे. त्याचवेळी भारतात गोरगरीबांना मोफत मिळणाऱ्या अन्नधान्यापासून ते पाकिस्तानच्या तुलनेत माफक दरात उपलब्ध असलेला भाजीपाला व फळफळावळ पाहून पाकिस्तानची जनता आपल्या नेत्यांच्या नावाने खडे फोडत आहे.

पाकिस्तानात प्रचंड प्रमाणात महागाई भडकलेली असताना, भारतातून जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा पाकिस्तानला सहजपणे केला जाऊ शकतो. यामुळे दरवाढ सहन करावी लागणार नाही, हे लक्षात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी थेट भारताला सहाय्याची विनंती केली होती. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने भारताकडून हे सहाय्य मिळविण्यासाठी संबंध सुधारण्याची तयारीही दाखविली. पण विरोधी पक्षनेते असलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानचे सरकार भारतासमोर गुडघे टेकत असल्याचे आरोप सुरू केले. यामुळे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना माघार घ्यावी लागली.

या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा इम्रान खान यांनी आपले भारतविरोधी राजकारण पुढे रेटून आपण अधिक राष्ट्रवादी असल्याचा प्रचार सुरू केला आहे. माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा भारतधार्जिणे असल्याची इम्रान खान यांनी केलेली टीका पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण विद्वेषावरच आधारलेले असेल, असा संदेश देत आहे. याचा फटका दुसऱ्या कुणाला नाही, तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाच बसत असून असल्या दळभद्री राजकारणामुळे पाकिस्तान फुटण्याची वेळ आली आहे, तरीही आमच्या नेत्यांना त्याची पर्वा नाही. ते आपला स्वार्थ साधण्यात मश्गूल आहेत, अशी जळजळीत टीका काही पत्रकार व विश्लेषक करीत आहेत.

लष्करप्रमुखपदावर असताना जनरल बाजवा यांनी काही पत्रकारांकडे भारताशी संबंध सुरळीत करणे पाकिस्तानच्या हिताचे असल्याचे म्हटले होते. यामुळे पाकिस्तानच्या अनेक समस्या सुटतील, असा विश्वास बाजवा यांना वाटत होता. म्हणूनच त्यांनी उघडपणे भारताला मध्य आशियाई देशांबरोबर व्यापारासाठी मार्ग खुला करून देण्याचीही तयारी दाखविली होती.

leave a reply