निदर्शनांमुळे हादरलेल्या पाकिस्तानने सोशल मीडिया ब्लॉक केला

इस्लामाबाद – तेहरिक-ए-लबैक संघटनेच्या निदर्शनांमुळे हादरलेल्या पाकिस्तानने शुक्रवारी सोशल मीडिया ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. अजूनही पाकिस्तानसमोरील हे निदर्शनांचे संकट टळलेले नाही. उलट इतर देशांमधील पाकिस्तानी लबैकच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसू लागले आहे. ब्रिटनमधील पाकिस्तानच्या दूतावासासमोर लबैकच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने करून या संघटनेला पाठिंबा जाहीर केला.

सोमवारपासून लबैकच्या निदर्शकांनी जोरदार निदर्शने सुरू करून पाकिस्तानात धुमाकूळ घातला होता. लाहोरसारख्या पाकिस्तानच्या प्रमुख शहरात लबैकचा जबरदस्त प्रभाव असून इतर शहरांनाही लबैकच्या निदर्शकांनी वेठीस धरले होते. यामुळे दोन दिवस पाकिस्तान ठप्प पडल्यासारखे दिसत होते. मात्र या काळात लबैकच्या निदर्शकांवर कारवाई करण्याची हिंमत पाकिस्तानचे सरकार व यंत्रणा दाखवू शकल्या नाहीत. मात्र आता या निदर्शकांवर कठोर कारवाई सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून याचा परिणाम दिसू लागला आहे.

मात्र अजूनही पाकिस्तानचे सरकार व सुरक्षा यंत्रणा धास्तावलेल्या आहेत. शुक्रवारी लबैकच्या समर्थकांना संदेश पोहोचविता येऊ नये, यासाठी पाकिस्तानने सोशल मीडिया बंद ठेवण्याचे आदेश आपल्या दूरसंचार विभागाला दिले होते. फ्रान्सच्या राजदूताला पाकिस्तानातून बाहेर काढा, ही लबैकची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य करता येणार नाही, असे पाकिस्तानचे सरकार स्पष्टपणे सांगत आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या सरकारने लबैकबरोबरील वाटाघाटीत ही मागणी मान्य केली होती.

फ्रान्सने पाकिस्तानातील आपल्या नागरिकांना तातडीने हा देश सोडण्याची सूचना दिली आहे. फ्रान्स या घडामोडींमुळे पाकिस्तानवर कमालीचा नाराज झाला असून याचा फटका पुढच्या काळात पाकिस्तानला बसणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. पाकिस्तानच्या सरकारनेच कट्टरपंथियांना प्रोत्साहन देण्याची आत्मघातकी भूमिका स्वीकारली होती. त्याचे परिणाम आता दिसू लागल्याचा ठपका पाकिस्तानी विश्‍लेषक ठेवत आहेत. तर लबैकच्या ब्रिटनमधील समर्थकांनी ब्रिटनच्या लंडनमधील पाकिस्तानच्या दूतावासासमोर निदर्शने करून आपली ताकद दाखवून दिली आहे.

leave a reply