पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ४० अफगाणी ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील खोस्त येथे हवाई हल्ले चढवून ४० जणांचा बळी घेतला. अफगाणिस्तानच्या सीमेजवळील प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह आठ जवान ठार झाले होते. त्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमाभागात हे हवाई हल्ले चढविले. तालिबानने या हल्ल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी हा हल्ला चढवून पाकिस्तानने युद्धाची नवी आघाडी सुरू केल्याचे दावे काहीजण करीत आहेत.

४० अफगाणी ठारसध्या पाकिस्तानच राजकीय उलथापालथी सुरू असून काही दिवसांपूर्वीच शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी हे सरकार अवैध असल्याचा आरोप करून सरकारविरोधात देशभरात निदर्शने सुरू केली आहेत. या निदर्शनांद्वारे इम्रान खान पाकिस्तानच्या लष्करी व राजकीय व्यवस्थेलाच थेट आव्हान देत आहेत. यामुळे पेट घेत असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तानची दैना उडेल, असा इशारा ख्यातनाम विश्‍लेषक व पत्रकार देत आहेत. अशा परिस्थितीत ‘तेहरिक-ए-तालिबान’ सारखी दहशतवादी संघटना पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात घातपात घडवित आहे.

तालिबानने ज्या प्रमाणे अफगाणिस्तानचा ताबा मिळविला, त्याच धर्तीवर तेहरिकने पाकिस्तान आपल्या कब्जात घेण्याची तयारी सुरू केली आहे. तेहरिकच्या दहशतवाद्यांनी उघडपणे याची घोषणा केलेली आहे. पाकिस्तानात राजकीय विसंवाद व अराजक माजलेले असताना, आपला हा हेतू साध्य करणे तेहरिकसाठी अधिक सोपे जाऊ शकते, अशी चिंता काही पत्रकार व्यक्त करीत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या सीमेजवळील पाकिस्तानच्या भूभागात लष्करावर होणार्‍या हल्ल्यामागे अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांची केंद्रे असल्याचे आरोप पाकिस्तानकडून केले जातात. लष्करी अधिकार्‍यासह आपल्या आठ जवानांचा बळी घेणार्‍या दहशतवादी हल्ल्यामागेही अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांचे केंद्र असावे, असा संशय पाकिस्तानात व्यक्त केला जातो. म्हणूनच गुरूवारी हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या कुनर प्रांतातील खोस्त येथे हल्ले चढवून ३० जणांचा बळी घेतला.

या बळींमध्ये महिला व मुलांचाही समावेश असल्याची माहिती अफगाणी वृत्तसंस्था देत आहेत. यावर अद्याप तालिबानने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण पाकिस्तानातून असा हल्ला झाल्याचे तालिबानने मान्य केले आहे.

leave a reply