पाकिस्तानची अवस्था ‘नाजूक’ बनली आहे

लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांची कबुली

इस्लामाबाद – पाकिस्तान सध्या नाजूक अवस्थेतून जात आहे, अशी कबुली लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी दिली. दहशतवाद व अर्थव्यवस्थेची घसरण या दोन प्रमुख समस्यांमुळे देशाची अवस्था नाजूक बनल्याचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. मात्र पाकिस्तान नाजूक स्थितीत नसून या देशाचे अस्तित्त्वच धोक्यात आल्याचे ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या घोषणेमुळे उघड झाले आहे. तेहरिकने पाकिस्तानातील आपल्या सरकारची घोषणा करून मंत्रिमंडळाचे वाटपही करून टाकले आहे. अशारितीने तेहरिककडून पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वालाच आव्हान दिले जात असल्याच्या बातम्या येत असताना, पाकिस्तानी लष्कराच्या सुमारे पाच हजार जवान व अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याच्या दाव्यांनी खळबळ माजविली आहे.

Pakistan's situation‘तेहरिक’ने पाकिस्तानी लष्कराबरोबरील संघर्षबंदी मोडीत काढून या देशात दहशतवादी हल्ल्यांचा सपाटा लावला आहे. तेहरिकच्या हल्ल्यात ठार होणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या अधिकारी व जवानांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्याचवेळी बलोचिस्तानातील बंडखोर संघटनांनीही पाकिस्तानी लष्करावरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. याने जेरीस आलेल्या पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईची घोषणा करावी लागली. गेल्या शुक्रवारी पार पडलेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी कमिटी-एनएससी’च्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी दहशतवाद्यांचा बिमोड केला जाईल, असे घोषित केले होते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी आपला देश दहशतवाद मूळापासून उपटून टाकणार असल्याची डरकाळी फोडली होती. पण त्यांच्या या दाव्यांवर पाकिस्तानातच कुणी विश्वास ठेवायला तयार नाही.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात पाकिस्तानी लष्कराच्या सुमारे पाच हजार जवान व अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे उघड करण्यात आले होते. सध्या पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा व इतर प्रांतातही दहशतवादी हल्लांचा सपाटा ‘तेहरिक’ने लावलेला आहे. त्याच्या भीतीने पाकिस्तानी लष्कराचा राजीनामा देऊन हे सारे आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दावे केले जातात. या व्हिडिओमुळे पाकिस्तानात खळबळ माजली होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने तसेच एनएससीच्या बैठकीत दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईची घोषणा करण्यात आली होती. पाकिस्तानचे नेते दहशतवादाच्या विरोधात आक्रमक कारवाईचे इशारे देत असतानाच, तेहरिकने चक्क पाकिस्तानात सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यानुसार तेहरिकने आपल मंत्रिमंडळ स्थापन केले असून यात संरक्षण, न्याय, माहिती, राजकीय व्यवहार व आर्थिक व्यवहारविषयक मंत्रालय स्थापन केल्याचे जाहीर केले. याद्वारे तेहरिकने पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाला खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी आपला देश नाजूक स्थितीत असल्याचे मान्य केले, ही लक्षवेधी बाब ठरते. त्याचवेळी लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी सर्वच घटकांनी दहशतवाद व आर्थिक समस्यांच्या विरोधात एकजूट करावी, असे आवाहनही केले. पण प्रत्यक्षात जनरल मुनीर यांनीच पाकिस्तानच्या विरोधी पक्षनेत्यांविरोधात आघाडी उघडल्याचे आरोप होत आहेत. विशेषतः माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात जनरल मुनीर यांनी अपप्रचाराची मोहीम छेडल्याची टीका सुरू झाली आहे. इम्रान खान यांनी माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाजवा लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले, तरी अजूनही ते आपल्याला लक्ष्य करीत असल्याची टीका इम्रान खान यांनी केली.

इतकेच नाही तर माजी लष्करप्रमुख बाजवा यांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांना कंत्राट दिल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. त्यामुळे सध्या तरी पाकिस्तानचे सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर गलिच्छ पातळीवरील आरोप करण्यातच धन्यता मानत असल्याची खंत या देशाचे पत्रकार व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून कुठलाही देश अवघे सहा अब्ज डॉलर्स परकीय गंगाजळीत असलेल्या पाकिस्तानला कर्ज द्यायला तयार नाही. नाणेनिधीने पाकिस्तानसमोर ठेवलेल्या शर्ती मानण्याखेरीज पर्याय नसल्याची कबुली पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतीच दिली होती. नाणेनिधीच्या शर्ती मानल्यानंतर पाकिस्तानात अधिक भडकलेल्या महागाईचा नवा आगडोंब उसळेल. याचा फायदा घेण्यासाठी विरोधी पक्ष टपून बसलेला आहे. यामुळे आर्थिक तसेच दहशतवादाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली एकवाक्यता पाकिस्तानमध्ये होईल, अशी शक्यता नाही.

अशा परिस्थितीत पाकिस्तानची अवस्था नाजूक बनल्याचे मान्य करून लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी काही प्रमाणात वास्तव स्वीकारल्याचे दिसत आहे. पण प्रत्यक्षात ते सांगत आहेत, त्यापेक्षाही पाकिस्तानची अवस्था कितीतरी भयावह बनलेली आहे. तेहरिकच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानात सरकार स्थापन करण्याची घोषणा करून या देशाच्या सार्वभौमत्त्वालाच आव्हान दिलेले असताना, पाकिस्तान नाजूक स्थितीतून नाही, तर कडेलोटापर्यंत येऊन ठेपल्याचा दावा या देशातील बुद्धिमंत वर्ग करीत आहे. म्हणूनच ज्या कुणाला शक्य आहे, तो प्रत्येकजण पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळ काढण्याच्या तयारीत असल्याचे दावे विश्लेषक करीत आहेत.

leave a reply