अफगाणिस्तानच्या पंजशीरमधील संघर्षात तालिबानचे 20 जण ठार

तालिबानचे 20 जण ठारकाबुल – अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील पंजशीर प्रांतात तालिबानआणि ‘नॉर्दन रेझिस्टन्स फ्रंट-एनआरएफ’मध्ये भडकलेल्या संघर्षात तालिबानचे 20 जण ठार झाले. गेल्या दहा दिवसात पंजशीरमधील संघर्षात तालिबानवर दुसऱ्यांदा एवढा मोठा हल्ला झाला आहे. तालिबानने एनआरएफच्या जवानांची निर्घृणरित्या हत्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पंजशीरमध्ये तालिबानवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातो.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केली. तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश प्रांताचा ताबा घेतल्याचा दावा करीत आहे. पण तालिबानने कितीही दावे केले तरी, दहा महिने उलटल्यानंतरही अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील पंजशीर प्रांत तालिबानच्या नियंत्रणाखाली आलेले नाही. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि ‘नॉर्दन रेझिस्टन्स फ्रंट’चे प्रमुख अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली ‘एनआरएफ’चे कमांडो तालिबानला आव्हान देत आहेत.

पंजशीरच्या दारा आणि रोखा या जिल्ह्यांमध्ये एनआरएफचे कमांडो आणि तालिबानमध्ये पेटलेल्या संघर्षात 20 तालिबानी मारले गेले. या हल्ल्यात तालिबानची वाहने उद्ध्वस्त झाली. एनआरएफने ठार झालेल्या तालिबानींच्या मृतदेहांचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तालिबानमधील बद्री फोर्सेस या कमांडो पथकाला लक्ष्य केल्याचा दावा एनआरएफ करीत आहे. तालिबानने उत्तरेकडील सीमेच्या सुरक्षेसाठी बद्री फोर्सेस तैनात केल्याच्या बातम्या याआधी आल्या होत्या.

गेल्या आठवड्यातही पंजशीरमधील संघर्षात 25 ते 30 तालिबानी मारल्याचा दावा एनआरएफने केला होता. गेल्या महिन्याभरात नॉर्दन फ्रंटने तालिबानवरील हल्ले वाढविल्याच्या बातम्या आल्या होत्या. पंजशीरमधील हल्ल्यांमध्ये किमान 70 तालिबानी ठार झाल्याची माहिती एनआरएफने दिली होती. तर तालिबानही पंजशीरमधील एनआरएफचे समर्थक व नागरिकांवर अत्याचार करीतअसल्याचा आरोप होत आहे. दहा दिवसांपूर्वी तालिबानने एनआरएफच्या जवानांची अतिशय क्रूरपणे हत्या केली होती. यानंतर संतापलेल्या एनआरएफने तालिबानच्या दहशतवाद्यांना घेरून त्यांच्यावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली.

तालिबानविरोधात संघर्ष करणाऱ्या एनआरएफच्या जवानांना ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानातून शस्त्रसहाय्य मिळत असल्याचे आरोप याआधी झाले होते. याविरोधात तालिबानने ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सीमेवरील तैनाती वाढविली होती. तसेच एनआरएफला शस्त्रसज्ज करणे थांबविले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी तालिबानने दिली होती. यानंतर या दोन्ही मध्यआशियाई देशांनी अफगाणिस्तानच्या सीमेवरील सुरक्षा यंत्रणांना सावध राहण्याची सूचना केली होती. तसेच अफगाणिस्तानातून दाखल होणाऱ्या निर्वासितांवर तात्पुरत्या काळासाठी बंदी लादली होती.

दरम्यान, पंजशीरवर ताबा मिळविण्यासाठी तालिबानमधील हक्कानी गट उतावीळ झाल्याचा दावा केला जातो. या हक्कानी गटाने पाकिस्तानातील आपल्या हस्तकांच्या सहाय्याने पंजशीरमध्ये रासायनिक हल्ले चढविण्याचा कट आखल्याचा आरोप होत आहे. तर तालिबानने पंजशीरच्या परयान जिल्ह्यामध्ये चार हजार जणांना रवाना केल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply