चिनी जहाजांच्या घुसखोरीवर फिलिपाईन्सची नाराजी

घुसखोरीवरमनिला/बीजिंग – फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत चीनच्या १५०हून अधिक जहाजांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. या घुसखोरीवर फिलिपाईन्सने तीव्र नाराजी व्यक्त केली असून राजनैतिक पातळीवर याचा निषेध नोंदविला आहे. त्याचवेळी फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेन्झना यांनी, अमेरिकेबरोबरील संरक्षण कराराच्या विरोधात चीनने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक दावा केला आहे.

गेल्या दशकात फिलिपाईन्सचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री अल्बर्ट डेल रोझारिओ यांच्या नेतृत्त्वाखाली चीनच्या साऊथ चायना सीमधील दाव्यांविरोधात आंतरराष्ट्रीय लवादासमोर दावा ठोकण्यात आला होता. या दाव्याचा निकाल फिलिपाईन्सच्या बाजूने लागला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी’नुसार फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील विशेष आर्थिक क्षेत्राला मान्यता दिली होती. त्यामुळे संपूर्ण ‘साऊथ चायना सी’ आपल्या मालकीचा आहे, या चीनच्या दाव्यांना धक्का बसला होता. त्यामुळे चीनच्या ‘नेव्हल मिलिशिआ’कडून सातत्याने फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत.

यावर्षी मार्च महिन्यात चीनने आपली शेकडो मच्छिमार जहाजे फिलिपिनी हद्दीत घुसविल्यानंतर फिलिपाईन्समध्ये चीनविरोधात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यात फिलिपाईन्स सरकार व लष्कराकडून साऊथ चायना सी प्रकरणात सातत्याने आग्रही भूमिका घेऊन चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. तरीही चीनच्या वर्चस्ववादी कारवाया थांबल्या नसल्याचे नव्या घुसखोरीवरून दिसून येत आहे.

चीनची १५०हून अधिक जहाजे गेल्या काही दिवसांपासून ‘स्कारबोरो शोल’नजिकच्या सागरी हद्दीत वावरत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे फिलिपाईन्स सरकारने तीव्र घुसखोरीवरनाराजी व्यक्त केली आहे. फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री तिओदोरो लॉक्सिन ज्यु. यांनी परराष्ट्र विभागाला राजनैतिक पातळीवर निषेध नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. चीनची घुसखोरी रोखण्यासाठी फिलिपिनी यंत्रणा गस्त वाढवेल, असे संकेतही देण्यात आले आहेत.

दरम्यान, फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेन्झना यांनी, चीनच्या दबावाविरोधात उघड भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. अमेरिका व फिलिपाईन्समध्ये सात दशकांपूर्वी संरक्षण करार झाला होता. या संरक्षण कराराची व्याप्ती वाढविण्याचे संकेत दोन्ही देशांकडून देण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर फिलिपाईन्सने करारात बदल करण्यासंदर्भातील हालचाली थांबवाव्यात, असा धमकीवजा सल्ला चीनकडून देण्यात आला होता, असे वक्तव्य फिलिपिनी संरक्षणमंत्र्यांनी केले आहे. २०१८ साली चिनी राजदूतांनी यासंदर्भात संपर्क साधला होता, असेही संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेन्झना यांनी स्पष्ट केले.

राजनैतिक निषेध व संरक्षणमंत्र्यांचे वक्तव्य या पार्श्‍वभूमीवर, चीन व फिलिपाईन्समध्ये साऊथ चायना सीच्या मुद्यावर असणारा वाद अधिकच चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत. फिलिपाईन्सचे तटरक्षक दल तसेच टास्क फोर्सकडून चिनी जहाजांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावणत येत आहेत. काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमध्ये चीनप्रमाणेच कृत्रिम बेटे उभारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर चीनकडून दरवर्षी लादण्यात येणारी मासेमारीवरील बंदीही फिलिपाईन्सने उघडपणे धुडकावली होती.

leave a reply