सुलेमानीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अमेरिकी संसदेवर विमान धडकवणार

- निनावी संदेशानंतर अमेरिकेची ‘एफबीआय’ सतर्क

वॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकन संसदेची प्रसिद्ध इमारत व परिसरात विमान धडकवून कासेम सुलेमानीचा हत्येचा सूड घेण्याच्या धमकीचा संदेश समोर आला आहे. अमेरिकेच्या ‘हवाई वाहतूक नियंत्रण’ यंत्रणेच्या रडारवर हा संदेश मिळाला. यामुळे अमेरिकी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून ‘एफबीआय’ने चौकशी सुरू केली आहे.

इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्यावर अमेरिकेने चढविलेल्या ड्रोन हल्ल्याला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. याबरोबर इराणकडून तसेच इराणसमर्थक दहशतवादी संघटना व कट्टरपंथियांकडून अमेरिकेला दिल्या जाणार्‍या धमक्यांचे सत्रही वाढले आहे. दोन दिवसांपूर्वीच इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतच हल्ले चढविले जातील, अशी धमकी दिली होती.

पुढच्या काही तासातच, सुलेमानी यांचा सूड घेण्यासाठी अमेरिकी संसदेच्या इमारतीच्या परिसरात विमान आदळण्याची धमकी प्रसिद्ध झाली. अमेरिकी वृत्तवाहिनीने या धमकीची बातमी प्रसिद्ध केली. सुलेमानी यांच्या जहाल समर्थकाने किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी ही धमकी दिल्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे इराण व इराणसमर्थक गट अमेरिकेत नवा ९/११ घडविण्याच्या तयारीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करू लागली आहेत.

इराणचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाकेरी यांनी पुन्हा एकदा अमेरिका व आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांना धमकावले. इराणच्या लष्कराची बोट बंदूकीच्या चापावर (ट्रिगर) असल्याचा इशारा मेजर जनरल बाकेरी यांनी दिला. ‘इराणला आपल्या शेजारी देशांविरोधात कुठलीही आक्रमकता दाखवायची नाही. पण इराणच्या लष्कराची बोट ट्रिगरवर आहेत व शत्रूच्या एका चुकीवर इराणचे जवान कारवाई करतील’, अशी धमकी बाकेरी यांनी दिली.

दरम्यान, सुलेमानी यांच्या हत्येत सहभागी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ‘इंटरपोल’ने अटक करावी, यासाठी इराणने ‘रेड नोटीस’ बजावली. गेल्या सहा महिन्यात इराणने दुसर्‍यांदा ही नोटीस बजावली आहे.

leave a reply