पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्तव्यपथ’ व नेताजींच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण

Revamped Central Vistaनवी दिल्ली – ‘गुलामीचे प्रतीक असलेला राजपथ आता कर्तव्यपथ बनत आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी झाले आहे. याद्वारे आपण आधुनिक व सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठा केली असून ही घटना अभूतपूर्व व ऐतिहासिक ठरते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सेंट्र्ल व्हिस्टा पुनर्विकास योजनेचा भाग असलेल्या ‘सेंट्र्ल व्हिस्टा अव्हेन्यू’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. यानुसार राजपथ आणि सेंट्र्ल व्हिस्टाच्या आजूबाजूच्या परिसराचा कायापालट व विकास करण्यात आला आहे. या ठिकाणी सुशोभीकरणापासून आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याद्वारे राजपथाला नवे रुप देण्यात आले असून राजपथाचे ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण करण्यात आले.

PM dedicatesभारत स्वतंत्र झाला त्यावेळी राजपथ हा किंग्ज्‌‍ वे म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यानंतर किंग्ज्‌‍ वेचे भाषांतर राजपथ असे करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळूनही आपण गुलामगिरीची प्रतिके तशीच कायम राहिली. वसाहतवादी मानसिकतेचा कोणताही लवलेश मागे न ठेवता आपल्याला देशाचा विकास घडवायचा आहे. त्यामुळे गुलमागिरी व राजसत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्यपथ बनत आहे. जनतेच्या सशक्तीकरणाचे प्रतीक म्हणून हे नाव बदलले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कर्तव्यपथावर भविष्यातील भारत दिसेल. हे नाव बदलल्याने देशाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘सेंट्र्ल व्हिस्टा अव्हेन्यू’अंतर्गत इंडिया गेट जवळ ज्या ठिकाणी पूर्वी ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज राजाचा पुतळा होता. त्याठिकाणी आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी नेताजींच्या या भव्य पुतळ्याचेही यावेळी अनावरण केले. २६ फुट उंचीचा मोनोलिथिक ग्रॅनाइटपासून बनलेला हा पुतळा देशातील नेताजींचा सर्वात मोठा पुतळा ठरतो. या ठिकाणी जॉर्ज पंचम यांचा पुतळा हटवून नेताजींचा पुतळा स्थापन होत आहे. त्याचबरोबर आपण ज्या सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठा करत आहोत, त्या भारताचे संकल्पही आपलेच असतील व प्रतिकेही आपलीच असतील, असे पंतप्रधानांनी यावेळी ठासून सांगितले. याआधी पंतप्रधान मोदी यांनी ‘सेंट्र्ल व्हिस्टा अव्हेन्यू’च्या पुनर्बांधणीच्या काम करणाऱ्या कामगारांशीही संवाद साधला.

leave a reply