पाकिस्तानचे लष्करप्रमुख पंतप्रधान इम्रान खान यांचा राजीनामा घेणार

- माध्यमांचा दावा

राजीनामाइस्लामाबाद – पाकिस्तानातील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’च्या बैठकीनंतर, पंतप्रधान इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना या देशाच्या लष्कराने केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी इम्रान खान यांना तसे आदेशच दिल्याचे दावे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. इम्रान खान यांना सत्तेवर आणणार्‍या व त्यांचा बचाव करणारे लष्करच विरोधात गेल्यामुळे राजीनामा देण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय नसल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

नुकत्याच केलेल्या एका भाषणात पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा केली होती. भारत एकीकडे अमेरिकेबरोबर सहकार्य करीत आहे, त्याचवेळी युक्रेनच्या युद्धात तटस्थ भूमिका स्वीकारून रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहे. यासाठी भारताची प्रशंसा करायलाच हवी. कारण आपल्या जनतेच्या हिताचा विचार करून भारत आपले परराष्ट्र धोरण आखत आहे, असे इम्रान खान पुढे म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून भारतावर दोषारोप करून जहरी शब्दात टीका करणार्‍या इम्रान खान यांच्या भूमिकेत झालेला हा बदल लक्षणीय ठरतो. सध्या पाकिस्तानात सुरू असलेल्या उलथापालथींमुळे इम्रान खान यांच्यात हा बदल झालेला असावा, असे माध्यमांचे म्हणणे आहे.

२५ मार्चपासून पाकिस्तानच्या संसदेचे सत्र सुरू होत आहे. या सत्रात इम्रान खान यांच्या सरकारविरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडला जाणार आहे. यावेळी विरोधी पक्ष इम्रान खान यांना सत्तेवरून खाली खेचण्यात यशस्वी ठरतील, असे संकेत मिळू लागले आहेत. कारण आजवर इम्रान खान यांना सत्तेवर आणून त्यांचा बचाव करणारे पाकिस्तानचे लष्करच आता त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसू लागले आहे. पाकिस्तानचे लष्कर आता राजकीय वादात कुणाचीही बाजू घेणार नाही, असा विश्‍वास विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नाही तर इम्रान खान यांचे कडवे समर्थक मानले जाणारे नेते आता विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी हातमिळवणी करीत असल्याच्या बातम्या येत आहेत.

अशा परिस्थितीत, पाकिस्तानातील ओआयसीच्या बैठकीनंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी केल्याची बातमी आली आहे. ‘आयएसआय’ या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाच्या नियुक्तीवरून पंतप्रधान इम्रान खान व जनरल बाजवा यांच्यात वाद झाले होते. त्यातच इम्रान खान यांच्या चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तानची आर्थिक पिछेहाट झाली असून त्यांच्या बेताल परराष्ट्र धोरणांमुळे मित्रदेशही पाकिस्तानवर नाराज आहेत. अमेरिकेला आव्हाने देणारी विधाने करून इम्रान खान यांनी आपली अधिकच कोंडी करून घेतली होती. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख इम्रान खान यांच्यावर कमालीचे संतापल्याचा दावा केला जातो.

अशा परिस्थितीत इम्रान खान यांना राजीनामा देण्यास भाग पाडून त्यांच्या जागी पाकिस्तानचे लष्कर सध्याचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांची पंतप्रधानपदी वर्णी लावणार असल्याचे सांगितले जाते. मात्र विरोधी पक्षनेते याला तयार नसून पाकिस्तानात निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांचे नेते करीत आहेत.

leave a reply