पंतप्रधान मोदी यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा

नवी दिल्ली – रशियाने आपल्या संघराज्याचा भाग बनविलेल्या लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन आणि झापोरिझिआ या चारही प्रांतांवर युक्रेनच्या लष्कराने हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत. तर या प्रांतावरील हल्ला म्हणजे रशियावरील हल्ला मानला जाईल, अशी घोषणा करून रशियाने याला जबरदस्त लष्करी प्रत्युत्तर देण्याचे इशारे आधीच दिले होते. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाबरोबरील राजनैतिक वाटाघाटींची शक्यताच निकालात काढलेली आहे. युक्रेनचे युद्ध अशा निर्णायक टप्प्यावर आलेले असताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही समस्या युद्धाने सुटणारी नाही, राजनैतिक वाटाघाटींनीच हा प्रश्न सुटेल, असे पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आपले योगदान देण्यास तयार असल्याचा प्रस्तावही पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला.

india ukraineयुक्रेनेचे युद्ध थांबवून त्वरित संवाद आणि राजनैतिक चर्चेची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना केले. युक्रेनची ही समस्या लष्करी कारवाईने सुटणारी नाही, अशी भारताची ठाम धारणा आहे. त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी व राजनैतिक वाटाघाटींसाठी भारत आपले योगदान देण्यासाठी तयार आहे, असा प्रस्ताव देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे नियम आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा तसेच सर्वच देशांचे सार्वभौमत्त्व आणि अखंडता याचा आदर व्हावा, अशी भारताची अपेक्षा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत स्पष्ट केले. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात भारताने वेळोवेळी हीच भूमिका मांडली होती.

दरम्यान, युक्रेनच्या युद्धामुळे झापोरिझिआ येथील अणुप्रकल्पाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी रशिया व युक्रेन एकमेकांवर आरोप करीत आहेत. युरोपातील सर्वात मोठा अणुप्रकल्प असलेल्या झापोरिझिआची सुरक्षा हा अतिशय संवेदनशील विषय बनला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील चर्चेत, आण्विक प्रकल्पांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. साऱ्या जगातील अणुप्रकल्पांची सुरक्षा, विशेषतः युक्रेनमधील अणुप्रकल्पाच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदी यांनी संवेदनशीलता प्रदर्शित केली. अणुप्रकल्प धोक्यात आले तर त्याचे भयंकर परिणाम जनतेचे आरोग्य व पर्यावरणावर होईल, अशी चिंता यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनचे चार प्रांत तोडून ते आपल्या भूभागाला जोडल्यानंतर युक्रेनच्या युद्धाची तीव्रता अधिकच वाढल्याचे दिसत आहे. आपल्या भूभागांच्या रक्षणासाठी रशिया अणुहल्ला चढविताना कचरणार नाही, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले आहे. तर पुतिन यांनी युक्रेनवर अणुहल्ला चढविला, तर अमेरिका व नाटो मिळून रशियन सैन्य उद्ध्वस्त करील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. यामुळे युक्रेनचे युद्ध विध्वंसाच्या नव्या वळणावर येऊन ठेपले असून अशा परिस्थितीत हे युद्ध रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. यासाठी भारताने आपली भूमिका पार पाडावी, अशी मागणी काही देशांच्या नेत्यांनी केली होती.

एकाच वेळी रशिया व युक्रेनशीही उत्तम संबंध असलेला भारत आपला प्र्रभाव वापरून हे युद्ध रोखू शकतो, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये पार पडलेल्या एससीओच्या बैठकीत भारताच्या पंतप्रधानांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर बोलताना, युद्धाचा काळ सरलेला आहे, असे सांगून युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विधानांना अमेरिका व युरोपिय देशांनी दुजोरा दिला होता. पंतप्रधान मोदी यांच्या या विधानांमुळे भारत युक्रेनच्या युद्धात कुणा एका देशाच्या बाजूने उभे असल्याचे दावे निकालात निघाले होते.

यानंर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील आपल्या भाषणात तसे दावे केले होते. तर फ्रान्सचे भारतातील राजदूत मॅन्युअल लिन्‌‍य यांनी आपला देश युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी भारताशी सातत्याने चर्चा करीत असल्याची माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर फोनवरून केलेल्या चर्चेला फार मोठे राजनैतिक महत्त्व आल्याचे दिसत आहे.

leave a reply