पंतप्रधान क्वाडच्या बैठकीसाठी जपानच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या भेटीवर निघाले आहेत. त्याआधी क्वाडच्या या बैठकीत सहकार्याचा आढावा घेता येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. इंडो-पॅसिफिक क्षेत्र व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्वाड देशांच्या समान हितसंबंधांबाबत विचारविनिमय करण्याची संधी मिळेल. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी विविध स्तरावरील द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मात्र जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्वाडच्या या बैठकीमुळे चीनमधील असुरक्षिततेची भावना उफाळून वर आल्याचे दिसत आहे.

Narendra-Modiजपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण या देशाच्या भेटीवर जात असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. तसेच क्वाड देशांच्या सहकार्याबरोबरच जपानमध्ये होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेलाही पंतप्रधान विशेष महत्त्व देत असल्याचे त्यांच्या विधानातून उघड होत आहे. भारत व जपानची विशेष धोरणात्मक भागीदारी भक्कम होत असल्याचे सांगून ही भागीदारी अधिक व्यापक करण्यावर आपण भर देणार असल्याचे पंतप्रधानांनी या दौऱ्याच्या आधीच स्पष्ट केले. तर ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशीही आपण चर्चा करणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान क्वाडच्या बैठकीसाठी निघालेले असतानाच, चीनने क्वाडवर सडकून टीका केली आहे. अमेरिकेची क्वाड पॉलिसी अपयशी ठरल्यावाचून राहणार नाही, असा तळतळाट चीनने व्यक्त केला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो-झरदारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही विधाने केली. आशिया-प्रशांत क्षेत्र हे शांतीपूर्ण विकासाचे केंद्र बनावे, भू-राजकीय स्पर्धेचे नाही, अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच या क्षेत्रात शीतयुद्धाच्या काळासारखा एखादा नाटोचा गट उभा राहता कामा नये, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न कधीही यशस्वी ठरणार नाही, असा दावा परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केला आहे.

तर चीनची सरकारी माध्यमे क्वाडची बैठक होत असलेल्या जपानवर जोरदार टीका करीत आहेत. मात्र यावेळी भारताला आपल्या टीकेचे लक्ष्य करण्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालय व सरकारी माध्यमे टाळत आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन अवैधरित्या करीत असलेली मासेमारी रोखण्यासाठी क्वाड प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी स्वतंत्र उपग्रह विकसित करून प्रक्षेपित केला जाईल, अशी माहिती माध्यमांमध्ये आली आहे. याचा प्रभाव दिसू लागला असून चीन यामुळे कमालीचा अस्वस्थ बनला आहे. यासंदर्भात क्वाडच्या सदस्यदेशांचे एकमत झाले, तर चीनला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अवैध मासेमारीला आवर घालावा लागेल.

मासेमारी करणारी चीनची शेकडो जहाजे म्हणजे गुप्तपणे कार्यरत असलेे चिनी नौदलाचे पथक असल्याचे आरोप याआधी झाले हेोते. याचा वापर करून चीन इतर देशांच्या सागरी क्षेत्रात आपला वावर वाढवित आहे. पुढच्या काळात या वावराचा अधिकार प्राप्त करून ते क्षेत्र आपलेच असल्याचे दावे ठोकण्याचे धोरण चीनने स्वीकारले आहे. फिलिपाईन्सबरोबरील सागरी वादात चीनने या डावपेचांचा वापर केला होता. त्याची दखल क्वाड देशांनी घेतली, तर ती चीनच्या विरोधातील अत्यंत महत्त्वाची घडामोड ठरू शकते.

leave a reply