युद्ध थांबविण्यासाठी पोप फ्रान्सिस यांचे रशिया-युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आवाहन

Pope Francis व्हॅटिकन सिटी – युक्रेनमध्ये सुरू असलेले हिंसाचार आणि मृत्यूचे चक्र थांबवा, असे कळकळीचे आवाहन ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना केले आहे. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमिर झेलेन्स्की यांनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी पोप फ्रान्सिस यांनी केली. तर आंतरराष्ट्रीय समुदायाने ही मानवी विपत्ती ठरणारे हे भयंकर युद्ध रोखण्यासाठी सर्वच राजनैतिक पर्याय तपासून पहावेत, असे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले आहे.

युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी हे युद्ध रोखण्यासाठी आवाहने केली होती. पण यावेळी पहिल्यांदाच त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना थेट संबोधित केले आहे. हिंसाचार आणि मृत्यूचे थैमान घालणारे चक्र थांबविण्याचे तसेच शांततेसाठी दिले जाणारे प्रस्ताव गंभीरपणे घेण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी करून पोप फ्रान्सिस यांनी मानवतेला सहन न होणारा घाव, अशा शब्दात युक्रेनच्या युद्धाचे वर्णन केले. या घावाने झालेली दुखापत कमी होण्याच्या ऐवजी अधिकच चिघळत चाललेली आहे, असे सांगून पोप फ्रान्सिस यांनी त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली.

putinयुक्रेनच्या युद्धाचे अणुयुद्धात रुपांतर होऊ शकते, असे इशारे दिले जात आहेत. त्याकडे लक्ष वेधून पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा मानवतेसमोर अणुयुद्धाचा अविवेकी धोका समोर खडा ठाकला आहे, याची जाणीव करून दिली. या युद्धात आणखी काय घडायचे आहे? आणखी किती रक्त सांडून त्यानंतर हे युद्ध थांबेल? असे प्रश्न पोप फ्रान्सिस यांनी केले आहेत. हे सारे थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सर्वच राजकीय पर्यायांचा वापर करायला हवा, असे आवाहन यावेळी पोप फ्रान्सिस यांनी केले.

याच्या आधी देखील पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनचे युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली होती. तसेच युक्रेनच्या युद्धाला नाटोने रशियाच्या द्वारापर्यंत मारलेली धडक जबाबदार असल्याचा ठपका पोप फ्रान्सिस यांनी ठेवला होता. तसेच युक्रेनचे युद्ध सुरू होण्याच्या आधीच एका देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी आपल्याला हे युद्ध सुरू होणार आहे, अशी माहिती आपल्याला दिल्याचे पोप फ्रान्सिस म्हणाले होते.

leave a reply