पाकिस्तानात हिंसाचाराचा नवा भडका उडण्याची शक्यता बळावली

इस्लामाबाद/लाहोर – ९ मे रोजी इम्रान खान यांच्या अटकेनंतर, त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान पेटवून दिले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालय व इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना जामीन मंजूर करून दिलासा दिला. यानंतर इम्रान खान विजयी ठरल्याचे दावे करण्यात येत होते. पण पाकिस्तानच्या लष्कराने सरकारला हाताशी धरून इम्रान खान व त्यांच्या समर्थकांचा निकाल लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ९ मे रोजी झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर नागरी आणि लष्करी न्यायालयात खटले चालविले जातील, असे पाकिस्तानच्या सरकारने जाहीर केले. पाकिस्तानच्या सुरक्षेबाबत निर्णय घेणाऱ्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल-एनएससी’ने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. यावर इम्रान खान यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी लष्करावर नव्या आरोपांचे सत्र सुरू केले आहे.

पाकिस्तानात हिंसाचाराचा नवा भडका उडण्याची शक्यता बळावलीइम्रान खान यांच्या लाहोरमधील घरामध्ये सुमारे ३० ते ४० दहशतवादी लपून बसले आहेत, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला. त्यांनी पुढच्या २४ तासात घराबाहेर पडावे, अशी सूचना लष्कराने केली. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही लष्कराने दिलेला आहे. पाकिस्तानी लष्करावर अकारण हल्ले चढविणारे व त्यासाठी बंदुकीचा वापर करणारे दहशतवादीच ठरतात. त्यामुळे ९ मे रोजी असे हल्ले चढविणाऱ्यांना दहशतवादी मानले जाईल, असे पाकिस्तानच्या सरकार व लष्कराने बजावले होते. इम्रान खान यांना या हिंसाचारावरून घेरण्याची तयारी सरकारने केली असून त्यांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे.

यामुळे कोंडी झालेल्या इम्रान खान यांनी ९ मे रोजीच्या हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला. निदर्शने करणाऱ्यांमध्ये बंदूक घेऊन वेगळेच कुणीतरी घुसले होते, असा दावा करून इम्रान खान यांनी याला पाकिस्तानील लष्करच जबाबदार असल्याचे संकेत दिले आहेत. याबरोबरच इम्रान खान आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून कदाचित हे आपले शेवटचे संबोधन असू शकेल, असे भावपूर्ण संदेश आपल्या समर्थकांना देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानात हिंसाचाराचा आगडोंब उसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

९ मे व त्यानंतर पाकिस्तानात झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर नागरी तसेच लष्करी न्यायालयात खटले चालविले जातील, असे पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरिअम औरंगजेब यांनी जाहीर केले. पाकिस्तानच्या एनएससीने देखील त्याला दुजोरा दिला आहे. यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांवर कठोर कारवाईची तयारी सरकार व लष्कराने केल्याचे दिसते. इम्रान खान यांच्या बाजूने उभ राहून हिंसाचार करण्यांची धडगत नाही, असा स्पष्ट संदेश याद्वारे पाकिस्तानी लष्कराकडून दिला जात आहे.

हिंदी

 

leave a reply