लडाखमधून चिनी लष्कराची माघारीची तयारी

नवी दिल्ली/लेह – सीमावाद सोडविण्यासाठी भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा पार पडली होती. त्यानंतर लडाखमध्ये तीन भागांमधून चीनने आपल्या जवानांना सुमारे अडीच किलोमीटर मागे घेतले आहे. तसेच भारतानेही आपले काही सैनिक या भागातून कमी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारतीय विश्लेषक भाकीत वर्तवत होते त्याचप्रमाणे सीमेवरील हा तणाव कमी होत असल्याचे दिसत आहे.

Ladakh China Armyलडाखमध्ये गलवान खोऱ्यात आणि पॅंगोंग सरोवर क्षेत्रात भारत आणि चीनचे सैनिक एकेमकांसमोर खडे ठाकून महिना उलटला आहे. या क्षेत्रात दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि संरक्षण साहित्य तैनात केले होते. तसेच चीनची सरकारी माध्यमे १९६२ च्या युद्धात झालेल्या स्थितीची आठवण करून देत भारताला धमकावीत होती. मात्र भारतीय लष्करानेही या भागात तैनाती वाढवून चीनला सडेतोड इशारा दिला होता. यानंतर गेल्या आठवड्यांपासून चीनची आक्रमक भाषा नरमल्याचे पाहायला मिळाले. चर्चेद्वारे दोन्ही देश यातून मार्ग काढतील असा सूर चीनकडून उमटू लागला. या पार्श्वभूमीवर ६ जून रोजी भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनच्या लष्कराचे मेजर जनरल लिन लियु यांच्यामध्ये चर्चा पार पडली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया दोन्ही देशांनी दिली होती. तसेच दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होतील, असे संकेत देण्यात आले होते.

मंगळवारी चिनी लष्कराने गलवान, पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग या तीन भागातून आपले जवान आणि लष्करी वाहने माघारी घेतल्याचे वृत्त आहे. सुमारे अडीच किलोमीटर चीनचे जवान मागे हटल्याचे सांगितले जाते. भारतानेही या तीन भागांमध्ये आपल्या सैनिकांची आणि लष्करी समुग्रीची संख्या कमी केली आहे. याआधी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेपूर्वीही काही भागातून चिनी जवान दोन किलोमीटर मागे सरकल्याच्या बातम्या आल्या होत्या.

दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आणि त्याआधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चीनने लडाखच्या काही सीमा क्षेत्रातून आपले जवान मागे घेतले आहेत. चीन हळूहळू काही भागातून आपल्या सैनिकांची संख्या कमी करीत आहे, अशीही बातमी आहे. हा भारताचा राजनैतिक विजयही मानला जातो. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी पुन्हा भेटणार असल्याचे आणि त्यापूर्वी तणाव कमी करण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे सांगितले जाते.

एका बाजूला चीनची जवान काही भागातून मागे गेल्याच्या बातम्या येत असताना चिनी हेलिकॉप्टर्सनी सीमेजवळून उड्डाणे केल्याच्या बातम्याही येत आहेत. तसेच भारताने लडाख सीमेजवळील दौलत बेग ओल्डी येथील एक जुनी धावपट्टी ४३ वर्षानंतर सक्रिय करणार असल्याची बातमीही येत आहे.ही धावपट्टी चीन सीमेपासून अवघ्या नऊ किलोमीटरवर आहे.

त्यामुळे दोन्ही देश सीमेवरून सैन्य माघारी घेत असले तरी, उभय देशांमधील हा सीमावाद इतक्यात सुटणार नाही. पुन्हा अशा स्वरूपाचा तणाव निर्माण होऊ शकतो असेही संकेत मिळत आहेत.

लडाखमधीलचिनी जवानांची घुसखोरी भारताला केवळ इशारा देण्यापुरतीच मर्यादित होती, असे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारत अमेरिकेबरोबर सामरिक सहकार्य विकसित करीत असून याद्वारे भारत चीनला आव्हान देत असल्याचा चीनचा समज आहे. तसेच कोरोनाच्या साथीनंतर बाहेर पडणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतात होणारी चीनची धोरणात्मक गुंतवणूक रोखणारे कठोर निर्णय भारत सरकारने घेतले आहेत.

त्याचवेळी भारतीय लष्कर गिलगिट बाल्टिस्तानसह पाकिस्तानव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भारतावर लष्करी दडपण वाढविण्यासाठी चीनने आपल्या लष्कराची घुसखोरी घडवून आणली. मात्र यापलीकडे जाऊन चीन आजच्या भारताच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलू शकणार नाही, असे भारतीय सामरिक विश्लेषक व माजी लष्करी अधिकारी आत्मविश्वासाने सांगत होते.

leave a reply