इस्रायलच्या पंतप्रधानांनी युएईचा दौरा पुढे ढकलला

जेरूसलेम – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आपला बहुचर्चित युएईचा दौरा पुढे ढकलला आहे. युएईच्या दौर्‍यासाठी जॉर्डनने हवाईहद्दीचा वापर करण्यास वेळेत परवानगी न दिल्याने सदर दौरा रद्द करावा लागल्याचे इस्रायल सरकारने सांगितले. या दौर्‍यात पंतप्रधान नेत्यान्याहू सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे नेत्यान्याहू यांच्या या दौर्‍याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते.

युएईबरोबरचे आर्थिक, व्यापारी तसेच इतर सहकार्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नेत्यान्याहू गुरुवारी अबू धाबीमध्ये दाखल होणार होते. गेल्या वर्षी इस्रायल आणि युएईमध्ये पार पडलेल्या सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर, पहिल्यांदाच पंतप्रधान नेत्यान्याहू युएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झईद अल नह्यान यांची भेट घेणार होते. गेल्या महिन्यात युएईच्या अधिकार्‍यांशी बोलताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी आपल्या या दौर्‍याची घोषणा केली होती.

पंतप्रधान नेत्यान्याहू आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांच्यातील या बैठकीमध्ये सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान देखील सहभागी होतील, असा दावा इस्रायलच्या रेडिओवाहिनीने बुधवारी रात्री केला होता. इस्रायल, युएई किंवा सौदीने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या दाव्यामुळे इस्रायली पंतप्रधानांच्या युएई दौर्‍याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते.

पण गुरुवारी सकाळी इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने सदर दौरा रद्द झाल्याचे जाहीर केले. जॉर्डनने इस्रायली पंतप्रधानांच्या विमानाला हवाईमार्ग देण्यास विलंब केल्यामुळे हा दौरा रद्द करावा लागल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. काही तासांपूर्वी जॉर्डनचे क्राऊन प्रिन्स हुसेन बिन अब्दुल्लाह इस्रायलच्या जेरूसलेममधील टेंपल माऊंटच्या भेटीसाठी येणार होते.

पण इस्रायलने क्राऊन प्रिन्स हुसेन यांच्या सुरक्षारक्षकांना इस्रायलमध्ये प्रवेश नाकारला. यामुळे संतापलेल्या क्राऊन प्रिन्स हुसेन यांनी सदर दौराच रद्द केला होता. त्याचा सूड म्हणून जॉर्डनने इस्रायली पंतप्रधानांच्या विमानाला परवानगी देण्यास विलंब केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. मात्र अधिकृत पातळीवर याबाबत कुठलीही प्रतिक्रिया इस्रायल किंवा जॉर्डनकडून आलेली नाही. मात्र यामुळे आखातातील घडामोडींना कमालीचा वेग आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

याआधी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्या उपस्थितत पंतप्रधान नेत्यान्याहू आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यात सौदीच्या निऑम सिटी येथे गोपनीय बैठक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सौदीने या बातम्या फेटाळल्या होत्या. पण इस्रायलच्या काही नेत्यांनी पंतप्रधान नेत्यान्याहू आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यात बैठक झाल्याचे मान्य केले होते. ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर, त्यांनी सौदीला धारेवर धरणारे व इराणबाबत उदार भूमिका स्वीकारणारे परराष्ट्र धोरण स्वीकारल्याचा दावा केला जातो. याचे पडसाद आखाती क्षेत्रात उमटू लागले आहेत. यामुळे इस्रायलबरोबरील आपले सर्वच पातळ्यांवरील सहकार्य दृढ करण्यासाठी सौदी व इतर आखाती देश उत्सुक असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेच्या इराणधार्जिण्या धोरणांविरोधात इस्रायल व सौदी तसेच सौदीसमर्थक देशांची आघाडी एकजूट करीत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.

इस्रायली पंतप्रधानांचा नियोजित युएई दौरा व या दौर्‍यात सौदीच्या क्राऊन प्रिन्सबरोबरील गोपनीय भेट, हे सारे इस्रायलच्या आखाती देशांबरोबरील वाढते सहकार्य दाखवून देत आहेत. मात्र इस्रायली पंतप्रधानांचा रद्द झालेला हा युएई दौरा, आखातात फार मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे. विशेषतः आखाती देशांनी इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केले तर त्याची किंमत चुकती करावी लागेल, ही इराणकडून दिली जाणारी धमकी आखातातील परिस्थिती स्फोटक बनल्याचे संकेत देत आहे.

leave a reply