भारतातून गहू निर्यातीला प्रोत्साहन गहू बंदरापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार

नवी दिल्ली – युक्रेन-रशिया युद्धामुळे जगाचे ‘ब्रेडबास्केट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काळ्या समुद्री क्षेत्रातील देशातून गहू व इतर कृषीमालाची निर्यात थांबली आहे. युक्रेन व रशिया हे दोन देश जगातील ३० टक्के गव्हाची निर्यात करतात. युद्धामुळे हा पुरवठा रोखला गेल्यानंतर अनेक देशांनी आता भारत, ऑस्ट्रेलियामधून गहू निर्यात सुरू केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातही गव्हाचा दर वाढला आहे. भारत सरकार या संधीचा लाभ घेऊन गहू निर्यातीला प्रोत्साहन देत असून रेल्वेही गहू निर्यातीत मोठी भूमिका बजावत आहे. पुढील पंधरा दिवसात रेल्वे २५० वाघीणीं (वॅगन्स) सात लाख टन गहू प्राथमिकतेने बंदरापर्यंत पोहोचविणार असल्याचे वृत्त आहे.
युक्रेन, रशिया आणि काळ्या समुद्री क्षेत्रातील देशांमधून होणार्‍या गहू व इतर कृषी मालाच्या निर्यातीवर अवलंबून असलेले देश भारतातून गहू आयात करण्यासाठी करार करीत आहेत. नुकताच थायलंड, सुदानसारख्या देशांनी भारतातून गहू आयातीचा निर्णय घेतला आहे. ईजिप्तही भारताबरोबर गहू आयातीवर चर्चा करीत आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर बांगलादेश, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, नायजेरीया आणि जपान सारख्या देशात भारताची गहू निर्यात वाढली आहे. तुर्की, चीन, इराण या देशांबरोबरही भारताचे गहू निर्यातीसंदर्भात चर्चा सुरू आहे. यमन, अफगाणिस्तान आणि कतारच्या बाजारातही भारत दाखल झाला आहे.
‘कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण’ने (एपीईडीए) नुकतीच निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठरविण्यासाठी संबंधित विभाग, भागधारकांची एक बैठक बोलावली होती. युक्रेन युद्धामुळे जगात गव्हाची निर्यात साखळीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची क्षमता भारतात असून या संधीचा लाभ घेण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त होते. या बैठकीतच विविध गहू उत्पादक राज्यातून निर्यात केला जाणार गहू वेगाने बंदरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे चालविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता व अधिकार्‍यांनी यासाठी आवश्यक रेल्वे वाघिणी उपलब्ध करून देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते.
यानुसार २५० वाघिणींद्वारे ७ लाख टन गहू बंदरांपर्यंत पोहोचविण्याची योजना आखण्यात आली आहे. येत्या पंधरवड्यात या विशेष रेल्वे मालगाड्या गहू बंदरांपर्यंत पोहोचविण्यासाठी चालविल्या जातील. पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा या गहू उत्पादक राज्यातून या जेएनपीटी व मुंबई बंदरांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी या रेल्वे गाड्या धावणार असल्याचे वृत्त आहे. तसेच बंदरांनाही गहू निर्यातीसाठी कंटेनरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची बातमी आहे. यावर्षी भारताची गहू निर्यात ७० लाख टनावर जाण्याचा अंदाज आहे.

leave a reply