बेलारुसमधील निदर्शकांकडून देशव्यापी संपाचा इशारा

मिन्स्क – बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत राजीनामा द्यावा, नाहीतर बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ बेलारुसमध्ये राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याविरोधात लोकशाहीवादी आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांनी सत्ता सोडण्यास नकार दिल्याने निदर्शकांनी आपला पवित्रा अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी राजधानी मिन्स्कसह देशाच्या विविध भागात झालेल्या निदर्शनांमध्ये ५० हजारांहून अधिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्याविरोधात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत तब्बल २८० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशव्यापी संप

९ ऑगस्टला बेलारुसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. गेली २६ वर्षे बेलारुसचे नेतृत्व करणाऱ्या लुकाशेन्को यांनी या निवडणुकीत आपल्याला ८० टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचा दावा केला होता. त्यांच्या प्रतिस्पर्धी स्वेतलाना तिखानोव्हस्काया यांना १० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप राजकीय पक्ष व आंतरराष्ट्रीय समुदायाकडून करण्यात येत असून, लुकाशेन्को यांच्याविरोधात व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. दोन महिन्याहून अधिक काळ सुरू असणाऱ्या या आंदोलनाला अमेरिकेसह युरोपीय देशांनी समर्थन दिले आहे. तर रशियाने लुकाशेन्को यांना पाठिंबा दिला आहे. मात्र रशियाच्या सहाय्यानंतरही त्यांना आंदोलन रोखण्यात अपयश आले आल्याचे दिसत आहे.

सलग दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, लुकाशेन्को यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणारे दडपणही वाढत चालले आहे. अमेरिका व युरोपिय देशांनी लुकाशेन्को यांना बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने बेलारुसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. ब्रिटनसह आठ युरोपिय देशांनी बेलारुसमधील आपले राजदूत माघारी बोलावले आहेत. गेल्याच आठवड्यात युरोपिय महासंघाच्या बैठकीत बेलारुसवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेली व्यापक निदर्शने व विरोधी नेत्यांनी लुकाशेन्को यांना दिलेला निर्वाणीचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

देशव्यापी संप

बेलारूस सरकारने गेल्या आठवड्यात, सुरक्षा यंत्रणांना निदर्शकांवर गोळ्या झाडण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात धनकावले होते. मात्र ही धमकी झुगारून रविवारी बेलारुसची जनता मोठ्या प्रमाणात निदर्शनांमध्ये सहभागी झाली. राजधानी मिन्स्कमध्ये ३० हजारांहून अधिक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. या निदर्शकांवर सुरक्षयंत्रणांनी जोरदार कारवाई केली. मिन्स्कसह देशाच्या इतर भागातून २८० निदर्शकांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर गेल्या दोन महिन्यात अटक झालेल्या निदर्शकांची संख्या १३ हजारांवर गेल्याचे सांगण्यात येते. रविवारी आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद दोन महिन्यांनंतरही राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्या विरोधातील असंतोष कायम असल्याचे दाखवून देणारा ठरतो.

याच पार्श्वभूमीवर, बेलारुसमधील आंदोलकांनी आपला पवित्रा अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. लुकाशेन्को यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही तर बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा विरोधी नेत्या स्वेतलाना तिखानोव्हस्काया यांनी दिला आहे. त्यामुळे नजिकच्या काळात बेलारुसमधील आंदोलनाचा अधिकच भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply