चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीआधी बीजिंगमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात निदर्शने

जिनपिंगबीजिंग – ‘शाळांमध्ये संप पुकारा, कारखान्यांमधील कामगारांनी संप पुकारा, चिनी जनतेने संप पुकारा. राष्ट्रद्रोही, हुकूमशहा जिनपिंगला सत्तेतून बाहेर फेका’, असे संदेश देणारे मोठे बॅनर्स राजधानी बीजिंगमध्ये लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात चीनमध्ये निदर्शने पार पडली असून यापुढे कम्युनिस्ट राजवटीचे निर्णय मान्य करणार नसल्याचा इशारा निदर्शकांनी दिला आहे. येत्या रविवारी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्याआधी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात पेटलेली निदर्शने लक्षवेधी ठरत आहेत.

आपल्या देशातील जनतेवर पूर्ण नियंत्रण ठेवणारा, त्यांचे अधिकार पायदळी चिरडणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाची पोलादी राजवट असलेला देश ही चीनची ओळख आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीविरोधात विचार मांडणाऱ्यांबरोबरच ते ऐकणाऱ्यांवर देखील चीनमध्ये गुन्हे दाखल केले जातात. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात झालेल्या निदर्शनांनी जगाचे लक्ष खेचून घेतले आहे.

राजधानी बीजिंगमधील अतिशय महत्त्वाच्या ‘सिताँग फ्लायओव्हर’वर निदर्शने आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी निदर्शकांनी दोन मोठे बॅनर लावले होते तसेच या फ्लायओव्हरजवळून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येथे जाळपोळही केली. यातील एका बॅनरवर ‘पीसीआर टेस्ट नको, तर अन्न हवे आहे. लॉकडाऊन नको तर स्वातंत्र्य हवे आहे. खोटेपणा नको तर प्रतिष्ठा हवी आहे. राजकीय क्रांती नको तर बदल अपेक्षित आहे. हुकूमशाही नको तर जनमतावर निवडून येणारे लोकशाही सरकार हवे आहे. आम्हाला गुलाम म्हणून नाही तर सामान्य माणून म्हणून जगायचे आहे’, अशा जहाल शब्दात जिनपिंग यांच्या राजवटीवर हल्ला चढविला. तर दुसऱ्या बॅनरमध्ये निदर्शकांनी चीनमधील प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात संप पुकारण्यासाठी आवाहन केले. याच बॅनरमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना राष्ट्रद्रोही आणि हुकूमशहा असे म्हटल्याची माहिती समोर येत आहे. सिताँग फ्लायओव्हरजवळून जाणाऱ्या प्रत्येक चिनी नागरिकाने या बॅनर्सचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर सावध झालेल्या कम्युनिस्ट पार्टीने सुरक्षा यंत्रणेला आदेश देऊन दोन्ही बॅनर काढून टाकले, सोशल मीडियावरील फोटोग्राफ्स व व्हिडिओज्‌‍ डिलीट करण्याचा प्रयत्न केला. पण इतके सारे करूनही हे प्रकरण पूर्णपणे दडपण्यात चीनच्या यंत्रणेला यश आलेले नाही. आंतरराष्ट्रीय माध्यमांमधअये याची बातमी बनली आहे.

जिनपिंगचीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दोन दिवसांपूर्वी शांघाय, झिंजियांग आणि युनान या भागांसाठी ‘झिरो कोविड पॉलिसी’ लागू केली. या तीनही भागांमध्ये सक्तीच्या लॉकडाऊनचे आदेश दिले होते. यापैकी झिंजियांग आणि युनान येथील विमानतळांवर रायफल्सनी सज्ज असलेले चिनी जवान तैनात केल्याचे व्हिडिओ समोर आले होते. झिंजियांगमधील काही प्रवाशांनी, ‘आत्ता फक्त आम्हाला मारायचे बाकी आहे’, अशा शब्दात आपला असंतोष व्यक्त केल्याचे या व्हिडिओतून उघड झाले होते. त्यामुळे जिनपिंग यांच्या झिरो कोविड पॉलिसीला संतापलेल्या चिनी जनतेने ही निदर्शने केल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. पण कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वाची बैठक अवघ्या दोन दिवसांवर असताना, बीजिंगमध्येच ही निदर्शने झाली आहेत, असे सांगून काही विश्लेषक यामागे चीनचे अंतर्गत राजकारण असल्याचे संकेत देत आहेत.

चार दिवसांपूर्वीच चीनमध्ये लोकशाहीची मागणी करणाऱ्या ‘न्यू फेडरल स्टेट ऑफ चायना’ या पक्षाने कम्युनिस्ट पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडीच्या 20 नेत्यांकडे जवळपास 534 अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचा ठपका न्यू फेडरल स्टेट ऑफ चायनाने केला होता. चिनीवंशियांनी ‘न्यू फेडरल स्टेट ऑफ चायना’ पक्षाची स्थापना केली असून कम्युनिस्ट पक्ष नष्ट करणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात पक्षांतर्गत तसेच लष्करामध्ये नाराजी वाढत असल्याच्या बातम्या याआधी आल्या होत्या. तर आत्ता चिनी जनताही जीवाची पर्वा न करता कम्युनिस्ट पार्टी व जिनपिंग यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घडामोडी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि कम्युनिस्ट राजवटीसाठी आव्हान ठरत आहेत. काही आठवड्यांपूर्वी जिनपिंग यांना बीजिंगमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याची चर्चा जगभरात सुरू झाली होती. पण जिनपिंग यांनी चीनवरील आपली पकड कायम असल्याचे काही दिवसातच दाखवून दिले होते. मात्र बीजिंगमधल्या निदर्शनांनी जिनपिंग यांच्या दाव्यावर नवे प्रश्न उपस्थित केल्याचे दिसत आहे.

leave a reply