विखुरलेल्या जगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘क्वाड’चे सहकार्य

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

विखुरलेल्या जगातीलम्युनिक – ‘भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या क्वाड संघटनेचा उल्लेख काही जणांकडून आशियाई नाटो असा केला जातो. मात्र हा भ्रामक प्रचार असून यामध्ये फसण्याची आवश्यकता नाही. क्वाड म्हणजे आशियाई नाटो नाही. तर क्वाड हा वैविध्यपूर्ण आणि विखुरलेल्या जगातील आव्हानांना प्रतिसाद देण्याचा २१ व्या शतकातील एक प्रकारचा मार्ग आहे. सध्याच्या जागतिक आव्हानांचा एकट्याच्या बळावर सामना करण्याची क्षमता जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाकडे नाही. अमेरिकेकडेही तशी क्षमता नाही’, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

जर्मनीमध्ये सुरू असलेल्या ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स-२०२२’मध्ये (एमएससी) परराष्ट्रमंत्री जयशंकर सहभागी झाले आहेत. या परिषदेत ‘अ सी चेंज रिजनल ऑर्डर ऍण्ड सिक्युरिटी इन इंडो-पॅसिफिक’ या विषयावर बोलताना क्वाड संघटनेवर आशियाई नाटो असल्याचा ठपका ठेवणार्‍या चीनला त्यांनी अप्रत्यक्ष समज दिली. चीनकडून याआधी अनेकवेळा क्वाड देशांमधील सहकार्यावर टीका करताना क्वाडवर आशियाई नाटो, असा ठपका ठेवला होता. तसेच काही देश याच पद्धतीने क्वाडच्या सहकार्याकडे पाहत आहेत. मात्र ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये क्वाडचे सहकार्य व्यापक व संयुक्त हित लक्षात घेऊन सुरू झाले आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

‘क्वाडमधील चारही देशांचे सामायिक हित आणि एकसमान मूल्ये आहेत. हे सहकार्य एकमेकांना पुरक आहे. चारही देश इंडो-पॅसिफिकमध्ये चार निरनिराळ्या टोकांवर वसलेले आहेत’, या बाबी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अधोरेखित केल्या. ‘२१ व्या शतकात विखुरलेल्या जगातील आव्हानांचा सामना एकट्याने करण्याच्या क्षमता सध्या जगात कोणत्याही देशाकडे नाही. या आव्हानांना उत्तर देण्याचा क्वाड हा २१ व्या शतकातील एक मार्ग आहे’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यावेळी ठळकपणे म्हणाले.

तसेच क्वाडचा आशियाई नाटो हा उल्लेख दिशाभूल करणारी संज्ञा असून काही जण या संज्ञेला पुढे रेटत आहेत. मात्र या भ्रामक प्रचारामध्ये फसू नका, असे आवाहन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केले. भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांमधील तीन देश हे आधीपासून कराराद्वारे सहकारी बनलेले देश आहेत. भारत असा कराराद्वारे सहकारी बनलेला देश नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्षात आणून दिले. तसेच अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर भारताचे सहकार्य गेल्या २० वर्षांपासून विकसित होत आहे. मात्र क्वाडचे स्वतंत्र असे महत्व आहे असेही ते म्हणाले.

लडाखमधील एलएसीवर चीनबरोबर वाढलेल्या तणावाचा उल्लेख करताना २०१७ साली क्वाड सहकार्याला सुरूवात झाली. २०२० नंतर हे सहकार्य अस्तित्वात आलेले नाही, याकडेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले. काही जणांकडून क्वाड देशांच्या सहकार्याला लडाखमधील तणावाशी जोडण्यात येते, याला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अप्रत्यक्ष उत्तर दिले. तसेच ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पुन्हा एकदा लडाखमधील तणावासाठी चीनच जबाबदार असल्याचे ठणकावून सांगितले. दोन्ही देशांमधील सीमेवर गेली ४५ वर्ष शांतता होती. १९७५ नंतर भारत-चीनमधील सीमेवर संघर्षात कोणीही मृत्यूमुखी पडले नव्हते. कारण एलएसीजवळ लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात केले जाणार नाही, असा करार भारत आणि चीनमध्ये झाला होता. मात्र चीनने त्याचे उल्लंघन केले. आजच्या घडीला चीन आणि भारताचे संबंध कधीही नव्हते इतके खराब स्थितीत असल्याचे व कठीण स्थितीतून जात असल्याचे जयशंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

leave a reply