कट्टरवादी व डावी विचारसरणी फ्रेंच समाजाला गिळंकृत करीत आहे

- फ्रान्सच्या उच्च शिक्षणमंत्र्यांचा इशारा

पॅरिस – ‘कट्टरवाद व अतिरेकी डावी विचारसरणी फ्रेंच समाजाला पूर्णपणे गिळंकृत करीत चालली आहे. यापासून विद्यापीठे देखील सुरक्षित राहिलेली नाहीत’, असा इशारा फ्रान्सच्या उच्च शिक्षणमंत्री फ्रेडरिक विदाल यांनी दिला. यामुळे फ्रेंच विद्यापीठांमधील संशोधक समाजाचे विभाजन करण्याच्या दृष्टीनेच प्रत्येक गोष्टीकडे पाहू लागले आहेत, असे सांगून याच्या सखोल चौकशीचे आदेश लवकरच दिले जातील, अशी लक्षवेधी घोषणा फ्रेडरिक विदाल यांनी केली. मंगळवारी फ्रान्सच्या संसदेने इस्लामी कट्टरपंथिय व विघटनवाद्यांच्या विरोधातील विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर विदाल यांनी केलेली ही घोषणा फ्रेंच सरकार या आव्हानाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे दाखवून देत आहे.

गेल्या काही वर्षात फ्रान्समध्ये कट्टरपंथियांकडून चढविले जाणारे दहशतवादी हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, कट्टरवाद्यांचा प्रभाव आणि फ्रेंच मूल्ये तसेच समाजाला असणारा त्याचा धोका हा मुद्दा प्रकर्षाने ऐरणीवर आला होता. काही महिन्यांपूर्वी एका फ्रेंच शिक्षकाची झालेली हत्या व त्यावरून उमटलेल्या पडसादानंतर फ्रेंच सरकारने हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांकडून करण्यात येणारी वक्तव्ये त्याला दुजोरा देणारी ठरतात.

फ्रान्सच्या उच्च शिक्षणमंत्री फ्रेडरिक विदाल यांनी ‘सीन्यूज टेलिव्हिजन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, फ्रेंच समाजासह शिक्षणसंस्थांमधील कट्टरवाद व डाव्या विचारसरणीच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले. फ्रान्ससह युरोपातील सर्वात मोठी संशोधन संस्था म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च’च्या (सीएनआरएस) माध्यमातून यासंदर्भातील चौकशी करण्याची घोषणाही उच्च शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. शैक्षणिक संशोधन आणि चळवळ व मत व्यक्त करणे, यातील भेद तपासातून ठरविला जाईल, असा दावा विदाल यांनी केला.

विदाल यांचे वक्तव्य व संसदेतील घोषणेवर शिक्षक तसेच संशोधकांच्या काही गटांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील सदस्य व उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी उच्च शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी शिक्षणसंस्थांमध्ये विचारसरणीच्या नावाखाली होणार्‍या गोंधळाची चौकशी करण्याची मागणीही केली होती. विदाल यांच्यापूर्वी फ्रान्सचे शिक्षणमंत्री जीन मिशेल ब्लँके यांनीही कट्टरवादी-डाव्या विचारसरणीवर टीकास्त्र सोडले होते. ही विचारसरणी फ्रेंच शिक्षणसंस्थांमध्ये अनर्थ घडवित असल्याचे ब्लँकर म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वी फ्रान्समधील १०० हून अधिक विचारवंतांनी एक खुले पत्र जारी केले असून, अमेरिकेतून येणारी दांभिक डावी विचारसरणी व बहिष्काराची संस्कृती फ्रान्सच्या अस्तित्वासाठी धोका ठरु शकते, असे बजावले होते. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनीही, कट्टरतावाद व विघटनवाद फ्रान्समध्ये कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला होता. फ्रान्सपूर्वी जर्मनी तसेच ब्रिटनमध्येही कट्टरपंथी तसेच डाव्या विचारसरणीविरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अमेरिकेत झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’च्या निदर्शनांना समर्थन देण्यासाठी ब्रिटनमध्ये जे आंदोलन झाले तो संपूर्ण प्रकार भयंकर होता आणि आपण त्याचे कधीही समर्थन करणार नाही, असे ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांनी बजावले होते.

leave a reply