आरबीआयकडून ‘युपीआय123पे` ही नवी सेवा सुरू

मुंबई – मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘युपीआय123पे` ही नवी युपीआय आधारित पेमेंट सिस्टिम लॉन्च केले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या हस्ते ‘युपीआय123पे`चा शुभारंभ झाला. आतापर्यंत युपीआय आधारीत सर्व पेमेंट सेवा या स्मार्टफोनसाठी होत्या. मात्र ‘युपीआय123पे` सिस्टिम ही साध्या फोनवरही इंटरनेटशिवाय वापरता येऊ शकेल. स्मार्टफोन हाती नसलेल्या 40 कोटी फीचर मोबाईल धारकांना डिजिटल व्यवहाराचे नवे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचा दावा केला आहे. तसेच ‘युपीआय123पे` या पेमेंट सिस्टिमच्या बरोबरीने आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या हस्ते ‘डीजीसाथी` या डिजिटल पेमेंटसाठीची चोवीस तास सुरू राहणारी हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली.

2016 साली देशात युपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर आधारित पहिली सेवा सुरू झाली होती. सुरक्षित डिजिटल सेवांना चालना देण्याच्या दृष्टीने आरबीआयने युपीआय व्यवस्था आणली होती. यावर केंद्र सरकारने भीम नावाचे ॲपही सुरू केले होते. सध्या अनेक बँका युपीआय आधारित पेमेंट सिस्टिमद्वारे डिजिटल पेमेंट सुविधा पुरवित आहेत. मात्र या बहुतांश सुविधा व संबंधीत ॲप्स हे स्मार्टफोन युजर्ससाठीच उपयोगी पडत आहेत. त्यामुळे देशात फिचर मोबाईल फोन वापरणाऱ्या मोठ्या लोकसंख्येला अद्याप डिजिटल पेमेंट सुविधेचा लाभ अद्याप उचलता आलेला नाही. त्यामुळे आरबीआयने लॉन्च केलेल्या ‘युपीआय123पे`द्वारे अशा सुमारे 44 कोटी फीचर फोनधारकांना डिजिटल पेमेंट सिस्टिमचा लाभ घेता येईल. या सेवेद्वारे हे सर्व फिचर फोन अर्थात सामान्य फोनधारक सुरक्षित डिजिटल पेमेंट करू शकतील. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा विशेष लाभ होणार आहे.

भारतात युपीआय सेवा सुरू झाल्यापासून सातत्याने या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या व व्यवहार वाढत आहेत. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 76 लाख कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयद्वारे झाले आहेत. तर याआधीच्या आर्थिक वर्षात 41 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते, अशी माहिती यावेळी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. तर लवकरच भारतात वर्षाला 100 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार हे युपीआयमार्फत होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी सामान्य मोबाईलवरही वापरता येणारी ‘युपीआय123पे` सेवा हा टप्पा गाठण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे आरबीआय गव्हर्नर दास यांनी अधोरेखित केले.

leave a reply